विकास निधीवरून कोकळगाव ग्रामसभेत राडा; शाब्दिक चकमक, लाथाबुक्क्या! एकाच घरात दोन घरे, काम न करताच हप्ते लाटल्याचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथे सोमवार, २४ रोजी आयोजित ग्रामसभेत घरकुल वाटपातील कथित गैरव्यवहार आणि विकासकामांच्या खर्चावरून अभूतपूर्व राडा झाला असून, आरोप-प्रत्यारोपांनंतर दोन गट थेट एकमेकांना भिडल्याने कोकळगावच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रामसभेचे रूपांतर रणकंदनात झाले. घर न बांधताच हप्ते, हप्ते उचलून गैरव्यवहार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे दरम्यान, सरपंचांनी सर्व आरोप फेटाळून लावले.

२४ रोजी सकाळी १० वाजता सुरू झालेल्या ग्रामसभेत घरकुलांच्या मुद्द्यांवरून नागरिकांनी सरपंच गुरुलिंग वाकडे तसेच मुख्याध्यापक सतीश रावजादे यांना घेरले. ‘काही मर्जीतील लोकांनी घराची एक वीटही रचली नसताना त्यांच्या खात्यात परस्पर हप्ते जमा कसे झाले? दुसरीकडे पदरमोड करून घर पूर्ण बांधणाऱ्या खऱ्या लाभार्थ्यांचे हप्ते का अडकवले?’ असा सवाल गावकऱ्यांनी केला.

एकाच घरात दोन-दोन घरकले देऊन पात्र लाभार्थ्यांना वंचित ठेवल्याचा आणि गावातील विकासकामांच्या नावाखाली लाखोंचा चुराडा केल्याचा आरोप करत विरोधकांनी हिशोबाची मागणी लावून शाब्दिक चकमकीचे रूपांतर धक्काबुक्की व थेट लाथाबुक्क्यांवर आले. तब्बल तीन तास चाललेल्या या अभूतपूर्व गोंधळामुळे वातावरण अत्यंत तणावपूर्ण बनले होते. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून शेवटी काही मोजके विषय पटलावर ठेवून सभा घाईगडबडीत गुंडाळण्यात आली. धरली होती. यावरून दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते.

सर्व कारभार पारदर्शक – सरपंच

सभेत झालेल्या गोंधळावर सरपंचांनी आपली बाजू मांडत सर्व आरोप फेटाळले. ते म्हणाले, ‘आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही, संपूर्ण यंत्रणा आणि निधीचे वाटप ऑनलाईन झाले आहे. कामात कुठेही गैरव्यवहार झालेला नसून आम्ही कुणाकडेही एक रुपया मागितलेला नाही. गावातील प्रत्येकाच्या अडचणी सोडवून सर्वसमावेशक विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.’ असे सरपंच गुरुलिंग वाकडी यांनी संपर्क साधला असता सांगितले.