हिंमत असेल तर नवे राज्यपाल आणून दाखवा! आदित्य ठाकरे यांचं मिंधे सरकारला आव्हान

‘राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोणते राज्यपाल अभिभाषण करणार, महाराष्ट्रद्वेष्टे राज्यपाल की नवे राज्यपाल? महापुरुषांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांनाच अभिभाषण करू देणार का?’ असे खणखणीत सवाल करत शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी ‘हिंमत असेल तर नवे राज्यपाल आणून दाखवा’, असं आव्हान राज्यातील ‘मिंधे-फडणवीस’ सरकारला दिलं.

शिवसेनेच्या शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने मराठवाड्यातील सोमठाणा येथे आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. येथील भव्य सभेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी राज्यातील सरकार आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. तुम्ही गुजरातचे मुख्यमंत्री नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात हे सिद्ध करा, असे आव्हान देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. आता हे गद्दार केवळ गद्दार राहिले नाही तर ते गुलाम झाले आहेत, असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केला. त्यासोबतच हे लोक कबड्डीच्या मैदानात गेले की म्हणतात आठ महिन्यांपूर्वी आम्ही कबड्डी खेळलो, दहीहंडीच्या ठिकाणी गेलो तर म्हणतात आम्ही सहा महिन्यांपूर्वी थर लावले, क्रिकेटच्या मैदानात गेले तर म्हणातात आम्ही मोठी मॅच खेळलो मात्र हे सगळं खोक्याततच चालतं. मात्र गद्दारीला फार आयुष्य नसतं, ज्यादिवशी संविधानाप्रमाणे निकाल येईल त्यादिवशी हे सरकार नामशेष झालेलं असेल आणि हे गद्दारही नामशेष झालेले असतील असा ठाम विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री दावोसला गेले तेव्हा त्यांनी बर्फ बघितला. मात्र तिथून राज्यासाठी काय आणलं त्यांचं त्यांनाच माहिती. ही सगळी आभासी गुंतवणूक आहे. त्याची पोलखोल झाली की मात्र ते गप्प बसले आणि काही बोलले नाही, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. आम्ही आमचं महाविकास आघाडी सरकार असताना केलं ते खणखणीत वाजवून केलं. शेतकऱ्यांना विनाअट कर्जमुक्ती दिली याची आठवणही त्यांनी करून दिली.

मिंधे सरकारकडे सांगण्यासारखं काय आहे? असा सवाल करतानाच त्यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला की, ‘सांगण्यासारखं काही नसल्यानं ते रिकाम्या खुर्च्यांना मन की बात सांगतात आणि सभेतल्या खुर्च्यांनाही यांचा कंटाळा आला आहे आणि आम्हाला उचलून घ्या असं खुर्च्याही म्हणताहेत’.