
निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या चिन्हाबाबत घेतलेला निर्णय हा अनपेक्षित व अनाकलनीय होता, अशी प्रतिक्रीया शिवसेना खासदार व नेते अनिल देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
आम्हाला अशी अपेक्षा होती की आम्ही कागदपत्र सबमिट केल्यानंतर निवडणूक आयोग त्याचा व्यवस्थित अभ्यास करून दोन्ही पक्षाला किंवा एक एकाला बोलवून का होईन आपली बाजू मांडण्याची संधी देईल. त्यानंतर त्यावर सुनावणी करेल. सुनावणीनंतर कागदपत्रांमधनं व पक्षाच्या बाजूमधून जे काही तथ्य आढळेल त्यावरून ते निर्णयावर येतील. मात्र तसं काही झालं नाही. आता त्यांनी त्यांच्या पत्रकात म्हटले आहे पोटनिवडणूक तोंडावर आहे, वेळ कमी आहे अशी कारणं दिली आहेत. परंतू शुक्रवारपर्यंत नामांकन भरण्याचा शेवटचा दिवस होता. सोमवारी दोन्ही पक्षांना बोलावून एक संधी दिली असती तर एक व्यवस्थितरित्या कुठेतरी न्यायाच्या चौकटीत काम होतय असं वाटलं असतं. केंद्रीय निवडणूक आयोगावर स्वच्छ व निरपेक्षपणे निर्णय देण्याचं काम व जबाबदाऱ्या आहेत. या सगळ्या गोष्टींना महत्त्व न देता अशा प्रकारचा धक्कादायक निर्णय देणं मुळातच अपेक्षित नव्हतं”, असे ते यावेळी म्हणाले.
शिवसेनेची महत्त्वाची बैठक
आज दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक पार पडणार असल्याची माहिती अनिल देसाई यांनी दिली. ”चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने जे काही ऑप्शन दिले आहेत त्यानुसार आज आम्ही निर्णय घेऊ. आज दुपारी एक महत्त्वाची बैठक आहे. त्य़ात हा निर्णय होईल. उद्धव ठाकरे यांनी ही मिटींग बोलावली आहे. ते याबाबत योग्य तो निर्णय घेतील” असे अनिल देसाई यांनी सांगितले.






























































