उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘आषाढी महोत्सव’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या ११ वर्षापासून शिवसेना आमदार हेमंत पाटील यांच्या पुढाकारातून घेण्यात येणाऱ्या आषाढी महोत्सवाचे २० ते २३ जुलैदरम्यान आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी ख्यातकिर्त भजन गायक अनुप जलोटा यांचा भजन संध्या व मराठी संगीत क्षेत्रात अल्पकालावधीत लोकप्रिय झालेला गाजलेला गायक अवधूत गुप्ते यांची संगीत रजनी हे खास आकर्षण राहणार आहे. शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी बुधवारी शासकीय विश्रामगृहात आषाढी महोत्सवाच्या कार्यक्रमाची माहिती दिली. गेल्या बारा वर्षापासून सातत्याने हा उपक्रम सुरु आहे.

दरवर्षी देशभरात व राज्यभरात गाजलेले दिग्गज कलावंत या कार्यक्रमात येतात. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी आषाढी महोत्सवाचे आयोजन नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने नांदेड दक्षिणचे आमदार हेमंत पाटील यांनी २० जुलै ते २३ जुलै दरम्यान शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे केले असून, या वर्षीच्या आषाढी महोत्सवात २० जुलै रोजी ख्यातकिर्त गायक सुरेश शुक्ल यांच्या मधूर स्वरांगण या गायनाचा कार्यक्रम आहे. २२ रोजी देवमुद्रा मुव्हमेंट स्कूल प्रस्तुत विठ्ठल तुकयाचा नृत्याविष्काराचा कार्यक्रम आहे. तर २३ जुलै रोजी ख्यातनाम गायक अवधूत गुप्ते यांच्या संगीत रजनी गायनाचा कार्यक्रम आहे.

hemant-patil-mla

आमदार हेमंत पाटील म्हणाले की, अत्यंत सुनियोजितपणे सन २००७ या वर्षापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आषाढी महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाचे हे १२ वे वर्ष आहे. या कार्यक्रमात आतापर्यंत श्रीमती सुमन कल्याणपूरकर, पं.ह्रदयनाथ मंगेशकर, अरुण दाते, श्रीमती उत्तरा केळकर, अजित कडकडे, चारुदत्त आफळे, श्रीमती गोदावरीबाई मुंडे, पं.उपेंद्र भट्ट, आनंद शिंदे, कु.राधा मंगेशकर, रविंद्र साठे, मिलिंद शिंदे, नंदेश उमप, श्रीमती मंगला खाडीलकर, श्रीमती वैशाली माढे, श्रीमती अनघा ढोमसे, ज्ञानेश्वर मेश्राम, अशोक कदम, प्रमोद कांबळे, अच्युत पालव, नितीन बानगुडे पाटील, अभिजीत बेल्हेकर, सुरेश वाडकर, साधना सरगम, विसूभाऊ बापट, श्रीमती अनुराधा पौडवाल, मिलिंद इंगळे, श्रीमती बेला शेंडे, शर्वरी जेमेनिस, वैशाली सामंत, पुष्पा पागधरे, आदर्श शिंदे आदी कलावंताची हजेरी लाभलेली आहे. तसेच आतापर्यंतच्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी शिवसेनेचे नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, खा.विनायक राऊत, शिवसेना सचिव खा.अनिल देसाई, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, राज्यमंत्री दिपक केसरकर, शिवसेना नेते खा.चंद्रकांत खैरे, खा. अरविंद सावंत, सुहास सामंत, विश्वनाथ नेरुरकर, बबन थोरात, कै.जाबुवंतराव धोटे, गणेशराव दुधगावकर, आ.जयप्रकाश मुंदडा आदी शिवसेना नेते व उपनेते तसेच सिनेकलावंत मोहन जोशी, मिलिंद गुणाजी, मंगेश देसाई या कलावंतांनी ही हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे. तरी यंदाच्या महोत्सवात नांदेडकर रसिकांनी या भक्ती रसात चिंब होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन हेमंत पाटील यांनी केले आहे.