निष्ठेच्या पांघरुणाखाली लपलेले लांडगे निघून गेले; शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा घणाघात

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी ठाण्यामध्ये धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी आपण राजकीय विषयावर बोलणार नसून राजकीय भाष्य करण्यासाठी आणि योग्य तो समाचार घेण्यासाठी आपण लवकरच ठाण्यात सभा घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

आता आपण महाआरोग्य शिबीराच्या उद्घाटनासाठी आलो आहोत.त्यामुळे आता राजकारणावर बोलणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. सध्या राजकारणात विकृतपणा दिसत असूनही शिवसेना आजही आपल्या मूळ विचारांपासून दूर गेलेली नाही. 80 टक्के समाजसेवा 20 टक्के राजकारण याच विचारसरणीवर शिवसेनेचे कार्य सुरू आहे. शिवसेना मूळ हेतूपासून दूर गेलेली नाही, याचा आपल्याला अभिमान आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

आता आपल्यासोबत अस्सल आणि निष्ठावंत शिवसैनिक आहेत. जे विकाऊ होते, ते गेले, ते काय भावाने गेले सर्वांना माहिती आहे. यावेळी मिंधे गटावर टीका करताना ते म्हणाले की, मिंधे गट आणि भाजपने केलेल्या विकृत आणि घाणेरड्या राजकारणाची देशभरात चर्चा सुरू आहे. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत भारत जोडो यात्रेसाठी कश्मीरमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांनाही तेथे याबाबतची चर्चा होताना दिसली. तिथेही हे विकाऊ आणि त्याची किंमत कळलेली आहे. देशभरात कश्मीरपर्यंत ही गोष्ट पसरली आहे. या घाणेरड्या राजकारणामुळे महाराष्ट्राची आणि शिवसेनेचीही बदनामी झाली आहे. महाराष्ट्रात निष्ठेच्या पांघरुणाखाली जे लांडगे घुसले होते, ते गेले आहेत, असेही ते म्हणाले. आता आपल्यासोबत अस्सल निखाऱ्यासारखे शिवसैनिक आहेत. हे निखारेच उद्या धगधगतची मशाल पेटवणार आहेत, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त खासदार राजन विचारे आणि निष्ठावंत शिवसैनिकांनी जनतेसाठी आयोजित केलेल्या शिबीराचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. त्यावेळी हे शिबीर आयोजित केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. तसेच या आरोग्यशिबीरासाठी आलेल्या सर्व डॉक्टरांप्रती त्यांनी आभार व्यक्त केले. आरोग्य किती महत्त्वाचे आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. कोरोनाकाळात डॉक्टर, नर्सेस आणि पोलिसांच्या रुपाने देव दिसला. राजकारणाच्या घाणीत पाऊल न टाकता समाजेसेवेचे काम करणारे खासदार राजन विचारे आणि शिवसैनिकांचे उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले. तसेच राजकारणावर बोलण्यासाठी लवकरच सभा घेणार असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.