
पैठण तालुक्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या बिडकीन व आडुळ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार अनुक्रमे अशोक धर्मे व बबन भावले हे विजयी झाले आहेत. गद्दार मंत्री संदीपान भूमरे यांनी या दोन्ही ठिकाणी प्रतिष्ठा पणाला लावली होती. तथापि कट्टर शिवसैनिक व ग्रामीण जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. विशेष म्हणजे बिडकीन येथील मिंधे गटाचे उमेदवार चक्क तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेले!
आज सकाळी 10 वाजता पैठणच्या तहसील कार्यालयात मतमोजणीला प्रारंभ झाला. 22 ग्रामपंचायतीत झालेल्या मतमोजणीच्या 8 फेऱ्या निश्चित करण्यात आल्या होत्या. दुसऱ्या फेरीत मतमोजणी सुरू होताच आडुळ ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार बबन भावले हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. तर तिसऱ्या फेरीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार अशोक धर्मे थेट सरपंचपदी विराजमान झाले. येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार लतिफ कुरैशी हे दुसऱ्या क्रमांकावर राहीले. परंतु मिंधे गटाचे उमेदवार बबन ठाणगे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. विशेष म्हणजे शिवसेनेशी गद्दारी करून मिंधे गटात सामील झालेल्या मंत्री संदीपान भूमरे यांनी येथील निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. ‘स्वयंचलित ऑडीओ कॉल’ व ‘फेसबुक व्हिडिओ क्लिप’ याद्वारे मंत्री संदीपान भूमरे यांनी बिडकिनच्या मतदारांना आवाहन केले होते. मात्र गद्दारीमुळे प्रचंड नाराज असलेल्या ग्रामीण भागातील मतदारांनी आपला रोष व्यक्त करुन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षालाच जनाधार असल्याचे शिक्कामोर्तब केले आहे.
































































