मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीश्वरांची तळी उचलण्यात व्यस्त, शिवसेनेची टीका

शिक्षक भरती करण्याच्या मागणीवरून एका अज्ञात शिक्षकाने मंत्रालयाच्या संरक्षण जाळीवर उडी मारण्याचा प्रयत्न केला आहे. संरक्षण जाळी असल्याने सुदैवाने या व्यक्तिला फारशी दुखापत झाली नाही. दरम्यान यावरून शिवसेनेने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यावर टीका केली आहे.

”या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? रखडलेली शिक्षक भरती लवकर सुरू व्हावी, कंत्राटी भरती प्रक्रिया रद्द व्हावी, याकरिता आज एका शिक्षकानं मंत्रालयाच्या संरक्षण जाळीवर उडी घेतली. महिनाभरापूर्वी शेतकऱ्यांनी देखील असेच आपल्या मागण्यांसाठी संरक्षण जाळीवर उड्या मारल्या होत्या. शेतकरी असो व शिक्षक… आपल्या देशाचे, समाजाचे हे दोन आधारस्तंभ! या मिंधे-भाजप सरकारचे आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले जावे, याकरिता या दोन्ही वर्गाला अशा प्रकारे आंदोलन करावे लागते, हेच खरे दुर्दैव आहे. या सगळ्या खऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीश्वरांची तळी उचलण्यात व्यस्त असतात, महाराष्ट्राच्या अन्नदात्याला, विद्यादात्याला वाऱ्यावर सोडतात” अशी टीका शिवसेनेने केली आहे. शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून त्या शिक्षकाचा व्हिडीओ शेअर करत हल्लाबोल करण्यात आला.