
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त उद्या, गुरुवारी मुंबईसह राज्यभरात रक्तदान शिबीर, वैद्यकीय तपासणी शिबीर, रुग्णांना फळवाटप अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
परळ येथे मोफत अन्नदान
मंथन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने केईएम रुग्णालय, टाटा रुग्णालयातील गरजू रुग्णाच्या नातेवाईकांना सकाळी 11 वाजता परळच्या कामगार मैदानासमोर मोफत अन्नदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय विद्यार्थी सेनेचे कार्यकारिणी सदस्य, माजी शाखाप्रमुख रमेश सावंत यांनी केले आहे.
दिव्यांग मुलांना खेळणी वाटप
परळ येथील सुभाष डामरे मित्रमंडळातर्फे सकाळी 11.45 वाजता कामगार मैदानामधील पोईबावडी शाळेतील विशेष दिव्यांग मुलांना खेळणी, चित्रकला साहित्य वाटप तसेच दादासाहेब फाळके रोडवरील बालिकाश्रमातील अनाथ मुलींना खाऊवाटप करण्यात येणार आहे.
शिवसेनाप्रमुखांची गाजलेली मुलाखत पाहण्याची संधी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विशेष मुलाखतीचा झंझावात हा कार्यक्रम उद्या, 17 नोव्हेंबर रोजी मुंबई दूरदर्शन केंद्र सह्याद्री वाहिनीवर सकाळी 10 वाजता आणि रात्री 10 वाजता प्रसारित होणार आहे. आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ही ऐतिहासिक मुलाखत सुप्रसिद्ध वृत्तनिवेदक मुलाखतकार प्रदीप भिडे यांनी घेतली आहे. दूरदर्शन निर्मिती जयू भाटकर यांची आहे.
























































