
शिवसेनेशी बेईमानी करून शिंदे गटात गेलेले खासदार नागेश पाटील आष्टीकर, संजय जाधव तसेच संजय देशमुख हे विमानतळावर उतरताच त्यांना शिवसैनिकांच्या संतापाचा सामना करावा लागला. विमानतळाबाहेर येताच शिवसैनिकांनी ‘गद्दार, गद्दार’ अशा घोषणा देताच तिन्ही गद्दार हादरले. सरकारने या गद्दारांना दिलेली सुरक्षा भेदून शिवसैनिकांनी पिंपळगाव फाटय़ावर या गद्दारांचा ताफा अडवला. शिवसैनिकांचा रुद्रावतार पाहून संजय देशमुख यांनी गाडी मागे वळवून पळ काढला तर नागेश पाटील आणि संजय जाधव यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
गद्दार गँगमध्ये सामील झाल्यानंतर खासदार नागेश पाटील आष्टीकर, संजय जाधव आणि संजय देशमुख हे एकाच चार्टर विमानाने सोमवारी रात्री मुंबईहून नांदेडला आले. गद्दार येणार असल्याचे कळताच विमानतळाबाहेर शिवसैनिक गोळा झाले. तीनही खासदार बाहेर येताच विमानतळाचा परिसर ‘गद्दार, गद्दार’च्या घोषणांनी दुमदुमुन गेला. विमानतळावरून निघालेल्या खासदारांच्या गाडय़ा शिवसैनिकांनी पिंपळगाव फाटय़ावर अडवल्या. खासदारांना देण्यात आलेल्या वाय प्लस सुरक्षेची ऐसीतैसी करून शिवसैनिकांनी गद्दारीचा जाब विचारताच वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी गाडी मागच्या मागेच वळवून पळ काढला. खासदार संजय जाधव आणि नागेश पाटील आष्टीकर यांनी कशीबशी वाट काढली.
पिंपळगाव फाटय़ावर गद्दारांना अडवणाऱया शिवसैनिकांच्या ‘ऑपरेशन तुडवा’चे नेतृत्व जिल्हाप्रमुख बबन बारसे यांनी केले. या आंदोलनात नांदेड उत्तरचे तालुका प्रमुख सुनील पाटील, मुदखेडचे तालुका प्रमुख पिंटू पाटील वासरीकर, दक्षिण नांदेडचे महानगरप्रमुख मनोज यादव, सिडको शहरप्रमुख अर्जुन ठाकूर, पिंटू सुनपे, गजानन गव्हाणे, नवनाथ जोगदंड, परशुराम सावंत, पुरभाजी जाधव, नितीन सरोदे, वकील सावंत, गणपत सोंदे, गिरजाराव पाटील, पप्पू राजेगोरे, शंकर हाफगुंडे, नितीन गिरी, पिंटू बिचेवार, अमोल गुंजकर आदी सहभागी झाले होते.
































































