
आपल्या आयुष्यात गुरू पाहिजेच. जो गुरुला विसरला तो माणूस असूच शकत नाही. आपल्याकडे आता गुरू चोरणारी लोकं तयार झाली आहेत, वडील चोरणारी लोकं तयार झाली आहेत. त्यांना चोरी करु द्या, पण संस्कार चोरी करुन येत नाहीत. ते जन्मजात असावे लागतात, असा सणसणीत टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिंधे गटाला लगावला. तसेच चांगले संस्कार घेण्यासाठी आणि संस्कार जपण्यासाठी आज मी आपले आशीर्वाद घ्यायला आलो आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
उद्धव ठाकरे हे गुरुवारी मीरा-भाईंदरच्या दौऱ्यावर आले होते. वालचंद हाईट्स येथे करण्यात आलेल्या जैन मंदिराच्या जीर्णोद्धारानिमित्ताने अंजन शलाका महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवास उद्धव ठाकरे उपस्थित राहिले आणि त्यांनी जैनमुनींचे आशीर्वादही घेतले.यावेळी उपस्थितांशी त्यांनी संवाद साधला.
संकट समयी येता कुणीही पुढे मदतीला येत नाही. पूजा म्हटली की सगळेच प्रसाद खायला येत असतात. मी संकटांना कधीच घाबरलो नाही. मी संकटात संधी शोधत असतो. लढाईत जो मर्द असतो त्याला लढाई लढण्याशिवाय पर्याय नसतो. समोर जेवढा ताकदवान विरोधक किंवा शत्रू असतो तेवढी लढाई जिंकण्यामध्ये जास्त हिंमत लागते आणि लढण्यामध्ये जास्त मजा येते. ही लढाई तर आम्ही जिंकणारच हा निश्चय करून मी आलेलो आहे, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
View this post on Instagram
हृदयात स्थान हवंय
ते पुढे म्हणाले की, तुम्ही मला बसायला आसन दिले, पण मला बसायला आसन नकोय तर हृदयात स्थान हवंय. या अशा खुर्च्या येतात आणि जातात. पण हृदयातील स्थान महत्त्वाचे आहे. माझ्या वडिलांनीही कधी खुर्चीची अभिलाषा ठेवली नाही ना मी. आम्ही तर काम करणारे लोकं आहोत, असेही ते म्हणाले.






























































