मैदाने आणि हरित क्षेत्रे खासगी संस्थांच्या घशात घालू देणार नाही! शिवसेना सत्ताधारी, प्रशासनाविरोधात आक्रमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेतील सत्ताधारी भाजप- शिंदे गटाने प्रशासनाला हाताशी धरून मुंबईतील मैदाने आणि हरित क्षेत्रांचे आरक्षण बदलून मोक्याच्या ठिकाणचे कोटय़वधीचे भूखंड खासगी संस्थांच्या घशात घालण्याचा डाव आखला आहे. याबाबत सुधार समितीच्या मंजुरीसाठी प्रस्ताव मांडण्यात आले आहेत. मात्र मुंबईकरांच्या हिताचे हे भूखंड खासगी संस्थांच्या घशात घालू देणार नाही, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

पालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, सुधार समिती सदस्य सचिन पडवळ आणि प्रमोद सावंत यांनी आज पालिका मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन पालिकेच्या धोरणावर सडपून टीका केली. सुधार समितीमध्ये मंजुरीसाठी मांडण्यात येणाऱया प्रस्तावानुसार मलबार हिल येथील उद्यानाचे आरक्षण बदलून निवासी आरक्षण टाकण्यात आले आहे, तर वांद्रे येथील खेळाच्या मैदानाचे आरक्षण बदलून एक्झिबिशन सेंटर सुरू करण्याचा घाट भाजप-शिंदे गटाने घातला आहे. मात्र उद्याने मैदाने मुंबईकरांसाठी असून कोणाच्या तरी फायद्यासाठी आरक्षणबदलास सुधार समितीच्या बैठकीत तीव्र विरोध करणार असल्याचा इशारा शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांनी दिला आहे.

तीन हजार कोटींचे ‘सेव्हन हिल्स’ खासगी संस्थेला

अंधेरी मरोळ येथील तीन हजार कोटींचे ‘सेव्हन हिल्स’ खासगी संस्थेला अवघ्या 230 कोटींसाठी देण्यात आल्याचा आरोप यावेळी शिवसेना नगरसेवक प्रमोद सावंत यांनी केला. ‘सेव्हन हिल्स’ रुग्णालय महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या एक दिवस कसा काय दिला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

सत्ताधारी पावसाळ्याआधीच पळ काढताहेत – किशोरी पेडणेकर

शिवसेनेच्या सत्ताकाळात काही वेळासाठी पाणी साचले तर अकांडतांडव करीत सत्ताधाऱयांच्या विरोधात गरळ ओकणाऱया भाजपने आता पावसाळय़ापूर्वीच मुंबईत पाणी तुंबणार असल्याचे म्हटले आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनीच याची कबुली दिली आहे. त्यामुळे सत्ताधाऱयांनी पावसाळय़ाआधीच पळ काढल्याचा टोला किशोरी पेडणेकर यांनी लगावला.