शिवसेना पुन्हा त्याच ताकदीने उभी राहील! शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ठाम विश्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बंजारा समाज हा स्थापनेपासून शिवसेनेसोबतच आहे. समाजातील एखाद्याने गद्दारी केली तरीही हा समाज आजही शिवसेनेसोबतच आहे. ज्यांनी गद्दारी केली त्यांच्या माथ्यावरील गद्दारीचा शिक्का कधीच पुसला जाणार नाही. शिवसैनिक शिवसेनेसोबत आहेत. तेव्हा असे कितीही गेले तरी त्याने पक्षाला काहीही फरक पडणार नाही. शिवसेना पुन्हा त्याच ताकदीने उभी राहील, असा ठाम विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला.

वाशिम जिह्यातील बंजारा समाजाचे नेते राजू नाईक, भोला राठोड, संदीप नाईक यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना भवन येथे भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, राजू नाईक यांनी शिवसेनेकडून लोकसभेची निवडणूक लढवली. त्या काळात त्यांनी तिथे जी बीजे रोवली त्यातून तयार झालेल्या झाडावर काही कुजकी फळे आली, पण ती आता झडून गेली आहेत. त्यामुळे आता पुन्हा नव्या उमेदीने आपल्याला शिवसेना उभी करायची आहे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

शिवसेना बंजारा समाजाच्या पाठीशी कायम उभी राहिली – राजू नाईक
बंजारा समाजासाठी शिवसेनेन खूप काही केले आहे. त्यामुळे समाजातून कोणीही गद्दार झाले तरी शिवसेनेच्या पाठीशी हा समाज आजही आहे आणि उद्याही राहील. पोहरादेवीचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज यांचा आशीर्वाद शिवसेनेसोबत आहे, असे राजू नाईक यांनी यावेळी सांगितले.

दसरा मेळाव्यानंतर पोहरादेवीचे दर्शन घेणार
दसरा मेळाव्यानंतर महाराष्ट्रभर फिरणार आहे. त्याच वेळी आपण पोहरादेवीच्या दर्शनासाठीही येणार आहोत. तेव्हा धर्मगुरू बाबूसिंग महाराजांनी आशीर्वाद म्हणून दिलेले कडे घालून तिथे येऊ, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.