
सामना प्रतिनिधी । कर्जत
आज मकरसंक्रांतीचा सण आहे पण खऱ्या अर्थाने निवडणुकीत विरोधकांवर संक्रांत आणण्याचा आपला निर्धार असल्याचे शिवसेनेच्या थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा जोशी यांनी स्पष्ट केले. कर्जत नगरपालिका निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक 5 च्या प्रचारावेळी त्या बोलत होत्या. या प्रचारावेळी शिवसेनेच्या शिलेदारांनी हा प्रभाग ढवळून काढला.
कर्जत नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रभाग क्रमांक पाच हा रेऊनी कॉलनी सम्यक, हरिद्वार, शिव ओम, चंद्रोदय, वृंदावन, सुमित, दर्पण सोसायटी, करमरकर वाडा, पालकर वाडा, विठ्ठल नगर, दिवाणी न्यायालय, परब नाट्यगृह, फडके हॉस्पिटल, गायकवाड हॉस्पिटल शितोळे चाळ, कडू चाळ, असा असून या प्रभागची मतदार संख्या ही २६८६ अशी आहे. या प्रभागातून इतर मागासवर्गीय आरक्षणातून भाजपचे बळवंत नरहरी घुमरे आणि सर्वसाधारण महिलासाठी शिवसेनेकडून संचिता संतोष पाटील या महायुतीतून उमेदवार म्हणून लढत आहेत.
या प्रभागातून २०१४ साली शिवसेनेचे संतोष पाटील हे ८०० मताच्या मताधिक्याने निवडून आले होते. त्यांच्याच पत्नी यावेळी या निवडणुकीच्या रिंगणात या प्रभागातून निवडणूक लढत असल्याने त्यांना त्यांच्या पतींनी या प्रभागात केल्याला कामाचा फायदा होणार आहे. या प्रभागात शिवसेनेचे नगरसेवक संतोष पाटील यांनी रस्ता, गटारे, ओपन जिम, अशी विविध प्रकारचे निधी आणून एकूण दहा कोटीचे कामे केली आहेत. त्यांच्या या कामा मुळे ते या प्रभागातील नागरिकांच्या पसंतीचे उमेदवार बनले आहेत.
मकरसंक्रांत हा सण असूनही प्रचार धुमधडाक्यात सुरू आहे. या दरम्यान शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना प्रचारादरम्यान थोरामोठ्यांचे आशीर्वाद मिळत आहेत. आज कर्जत शहरातील प्रभाग क्रमांक 5 मध्ये शिवसेनेच्या उमेदवारांची प्रचार रॅली झाली. यावेळी नगराध्यक्ष पदाच्या थेट उमेदवार सुवर्णा जोशी यांनी त्या प्रभागातील नागरिकांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, आज मकरसंक्रांतीचा सण आहे पण खऱ्या अर्थाने या निवडणुकीत विरोधकांवर संक्रांत आणणार हा निर्धार आम्ही केला असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. यावेळी मुद्रे ब्रू. रेवेंह्यू कॉलनी, सम्यानक आदी भागात प्रचार रॅली धुमधडाक्यात झाली. यावेळी शिवसेनेच्या उमेद्वारांसह स्थानिक नेते व पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी शिवसेनेच्या रणरागिनींची संख्या मोठ्या प्रमाणात होती.






























































