कुणाचा पोपट मेलाय ते जनताच दाखवेल, संजय राऊत यांची घणाघाती टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपच्या कार्यकारिणीत देवेंद्र फडणवीस म्हणाले की पोपट मेलाय. आता कुणाचा पोपट उडतोय ते त्यांना कळेलच. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकांत जे दिसलं ती एक झलक आहे. 14 महानगर पालिकांच्या निवडणुका ताबडतोब घ्या, मग कुणाचा पोपट मेलाय, ते जनताच दाखवेल अशी घणाघाती टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

माध्यम प्रतिनिधींशी बोलताना राऊत यांनी मिंधे गट आणि भाजपवर निशाणा साधला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजप कार्यकारिणीत शरद पवार यांच्या लोक माझे सांगातीमधील दहा वाक्य वाचून दाखवली. त्यावर पत्रकारांनी राऊत यांना प्रश्न विचारला. यावर बोलताना ते म्हणाले की, फडणवीस यांच्यावर सुद्धा काही वाक्यं आहेत, ती पण त्यांनी वाचून दाखवायला पाहिजे होती. काल त्यांच्या कार्यकारिणीच्या बैठकीत अर्धे लोक झोपलेले होते. आज फोटो आलेत. ते झोपलेल्या लोकांसमोर ते बोलले आहेत. ते फोटो पाहायचे असतील तर ‘सामना’ पाहा. त्यांचे मोठमोठे नेते आहेत. कोण जांभया देतंय, कोण झोपतंय, कोण खुर्चीत पडलंय. अशा मेलेल्या कार्यकारिणीसमोर हे आमची खिल्ली उडवतात.

राऊत यांनी म्हटले की, विधानसभा अध्यक्ष हे महात्मा आहेत. त्यांच्याकडून आम्हाला चांगल्या निर्णयाची अपेक्षा आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की पोपट मेलाय. आता कुणाचा पोपट उडतोय आणि कोणत्या वाघाची गर्जना होतेय हे त्यांना कळेलच. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकांत जे चित्र दिसलं ती फक्त झलक आहे. 14 महापालिकांच्या निवडणुका ताबडतोब घ्या, मग पोपट कुणाचा मेलाय हे जनता दाखवेल तुम्हाला, अशा शब्दांत राऊत यांनी टीकास्त्र सोडलं.

त्र्यंबकेश्वर मंदिरात गोमूत्र शिंपडणाऱ्यांवर कारवाईवरील प्रश्नावर राऊत म्हणाले की, नक्कीच. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेलं हिंदुत्व फार वेगळं होतं. ते हिंदुत्व वीर सावरकरांचं होतं. जे आता वीर सावरकर आता अचानक भाजपला आठवायला लागले. आणि गोमूत्रधारी हिंदुत्व हे भाजपचं आहे. काहीही झालं की गोमूत्र घ्यायचं आणि साफ करायचं. आता गोमूत्राची फॅक्टरी काढली की काय, ते पाहावं लागेल. या राज्यात हिंदुत्वाच्या नावावर दंगली घडवायच्या, दंगली घडवणाऱ्या टोळ्या निर्माण केल्यात त्यांनी, शेगाव असेल, नगर असेल. राम नवमीच्या निमित्ताने काय झालं ते आपण पाहिलं असेल. त्र्यंबकेश्वरची घटना भंपक आणि खोटी आहे. असं काहीही घडलेलं नाही. पण मी त्र्यंबकच्या नागरिकांचं अभिनंदन करतो की त्यांनी हा डाव उधळून लावला. आणि जे या सरकारच्या मनात दंगली घडवण्याचं मनात होतं, ते होऊ दिलं नाही. आणि गोमूत्रधाऱ्यांना पळवून लावलं, असं राऊत यावेळी म्हणाले.