
सामना प्रतिनिधी । परभणी
पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली असताना वीज वितरण कंपनी या परिस्थितीकडे गांभिर्याने लक्ष देत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जाब विचारण्यासाठी शिवसेना खासदार संजय जाधव यांनी महावितरणचे कार्यालय गाठून तेथील अधिकाऱ्यांवर विविध प्रश्नांची बरसात करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. दरम्यान, नवीन रोहित्रासाठी दोन कोटी रुपयांचा निधी त्वरीत उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी यावेळी खासदार संजय जाधव यांनी फोनवरुन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी संवाद साधत केली.
गेल्या काही दिवासांपासून ग्रामीण भागामध्ये वीजपुरवठा सुरुळीत होत नाही. याबाबतच्या तक्रारी महावितरणकडे करण्यात आल्या. या तक्रारींकडे वीज वितरणचे अधिकारी आणि कर्मचारी दुर्लक्ष करत होते. वारंवार तक्रारी करुनही अधिकारी लक्ष देत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी वीज वितरणच्या तक्रारी शिवसेना खासदार संजय जाधव यांना सांगीतल्या. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत खासदार जाधव यांनी महावितरणचे कार्यालय गाठले. दरम्यान, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी सोमवारी दुपारी महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी जिल्हा नियोजन समितीतून परभणी जिल्ह्यासाठी विद्युत रोहित्र खरेदीसाठी त्वरीत निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी केली. परभणी येथून काही रोहित्र नांदेड जिल्ह्याला पाठविण्यात आले. ही बाब समोर येताच वितरणचे अधिकारी निरुत्तर झाले. यावेळी खासदार जाधव यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी फोनवरुन थेट संवाद साधत परभणी जिल्ह्यासाठी नवीन रोहित्र खरेदी करण्यासाठी 2 कोटी रुपयांचा निधी त्वरीत उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी लावून धरली.
दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मंगळवारी मुंबई येथे खासदार संजय जाधव आणि महावितरणचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांची तातडीने बैठक बोलाविली आहे. खासदार जाधव यांच्या आग्रही मागणीवरुन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी परभणी जिल्ह्यासाठी रोहित्र खरेदीसाठी 2 कोटी रुपयांचा निधी तत्वत: मान्यता दिली. महावितरणकडे वारंवार शेतकऱ्यांनी मागणी करुनही अधिकारी रोहित्र उपलब्ध नसल्याच्या कारणावरुन वीज पुरवठा सुरळीत करत नव्हते. ही समस्या सोडविण्यासाठी खासदार संजय जाधव यांनी पुढाकार घेत शेतकरी आधीच दुष्काळाने होरपळलेला असताना वीज वितरण कंपनी वीज पुरवठा सुरुळीत करत नाही बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत त्वरीत हा प्रश्न निकाली न निघाल्यास आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
























































