
सामना ऑनलाईन, मुंबई
मराठी नाटकांना पावणे दोनशे वर्षांचा इतिहास आहे. या इतिहासाचे दर्शन घडवणारे नाटकांच्या परंपरा, त्यांचा इतिहास सांगणारे स्मारक मुंबईत उभारणार असल्याची घोषणा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. गिरगांवच्या बिर्ला क्रीडा केंद्रात हे स्मारक उभारण्यात येईल असंही त्यांनी जाहीर केले. हे स्मारक म्हणजे पुतळ्यांचे स्मारक नसून ते एक दालन असेल ज्यात नाट्यसंस्कृतीची उज्ज्वल परंपरा दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल असं उद्धव ठाकरे म्हणाले. ९८ व्या नाट्यसंमेलनाच्या समारोप सोहळ्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली.
नाट्यसंमेलनाच्या आयोजकांचे आणि खासकरून प्रसाद कांबळी यांचे कौतुक करताना उद्धव ठाकरे म्हणाले की प्रसाद यांच्याकडे कोणतंही संपर्क अभियान न राबवता माणसं जोडण्याची कला आहे. यंदाचे नाट्यसंमेलन हे मुंबई महापालिकेच्या कालिदास नाट्यगृहात होत आहे. याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की ९८वं संमेलन हे मुंबई महापालिकेच्या कालिदास नाट्यगृहात होतंय याचा मला अभिमान आहे.
नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा किर्ती शिलेदार यांच्यासह काही नाट्यकर्मींनी बाहेरगावहून मुंबईत येणाऱ्या कलाकांना राहण्याची गैरसोय होते याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की ही मागणी पूर्ण करण्यासाठी महापालिकेकडून जे करता येईल ते आम्ही करू.
यंदाच्या नाट्यसंमेलनात महाराष्ट्रातील लोककला, परंपरांचं दर्शन घडवण्यात आलं. याचं उद्धव ठाकरे यांनी मनापासून कौतुक केलं. कलाकार हा असंख्य प्रेक्षकांना जागेवर खिळवून ठेवतो ही कलाकारांची ताकद आहे, तुम्ही सगळेजण आनंदाचं वंगण आमच्या आयुष्यात टाकता आहात असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सगळ्या कलाकारांचे कौतुक केले आहे. संमेलनाच्या समारोप कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आमंत्रित करण्यात आलं होतं.

























































