
सामना प्रतिनिधी । गंगापूर
गंगापूर तालुक्यातील कनकोरी ग्रामपंचायतीवर भगवा फडकला. कनकोरी, कोळघर, मालुंजा (बु.) गु्रप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेच्या अंजली संजय डोळस यांची, तर उपसरपंचपदी रमेश चंद्रभान साळुंके यांची बिनविरोध निवड झाली आहे.
तालुक्यातील कनकोरी, कोळघर, मालुंजा (बु.) या ग्रुपग्रामपंचायतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंच प्रतिभा बाबासाहेब साळुंके यांच्यावर ११ सदस्यांपैकी ९ सदस्यांनी ३१ मार्च रोजी अविश्वास पारित झाला होता. तर उपसरपंच सुमनबाई बाबासाहेब डव्हाण यांनी स्वत:हून उपसरपंचपदाचा राजीनामा दिला होता. सरपंच व उपसरपंचपद दोन्ही पदे रिक्त झाले होते. काल गुरुवार, ५ जुलै रोजी ग्रामपंचायत कार्यालय, कनकोरी येथे मंडळ अधिकारी मंगल मोरे, तलाठी वायरूळ यांच्या उपस्थितीत सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली.
यावेळी सरपंचपदासाठी शिवसेनेच्या अंजली संजय डोळस, तर उपसरपंचपदासाठी शिवसेनेचे रमेश साळुंके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या दोघांव्यतिरिक्त एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याने सरपंचपदी अंजली डोळस, तर उपसरपंचदपदी रमेश साळुंके यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी मंगल मोरे यांनी जाहीर केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य अशोक पवार, अनुसया राऊत, मंगल पवार, सुमान डव्हाण, सुमनबाई उबाळे, भीमाबाई जाधव, सर्जेराव निळे आदी उपस्थित होते. शिवसेनेच्या अंजली डोळस व रमेश सोळुंके यांची निवड जाहीर झाल्यानंतर शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला. तसेच जिल्हा युवा अधिकारी संतोष माने, तालुकाप्रमुख दिनेश मुथा, माजी उपसभापती ताराचंद पवार आदींनी नूतन सरपंच, उपसरपंचाचे अभिनंदन केले.































































