शिवसेना पोलीस निरीक्षकांच्या पाठीशी, भाजप शहराध्यक्षाने केली होती मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जळगाव

चोपडा येथील कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्यावर जो अन्याय झाला आहे तो शिवसेना कदापी सहन करणार नाही. शिवसेना किसन पाटलांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहेच. तसेच पोलिसांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी दहशत एकजूट होऊन मोडून काढावी असे आवाहन शिवसेना आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले. पद्मालय शासकिय विश्रामगृहात चोपडा प्रकरणावर बोलण्यासाठी आमदार पाटील यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, मनपाचे विरोधी पक्षनेते डॉ.सुनील महाजन, माजी महापौर विष्णू भंगाळे, युवासेनेचे विस्तारक किशोर भोसले उपस्थित होते.

चोपडा पोलीस निरीक्षक मारहाण प्रकरणात अखेर ‘राजकारण’ जिंकले

स्वतः माजी पोलीस कर्मचारी असलेले आमदार किशोर पाटील यांना पोलिसांच्या व्यथा माहित आहेत. ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून किसन पाटील यांचा नामोल्लेख केला जातो. अशा अधिकाऱ्यावर कारवाई केली जात असेल तर कोणता अधिकारी आणि कर्मचारी आपले कर्तव्य निष्ठेने निभावणार असा प्रश्न उपस्थित केला. 6 गंभीर गुन्हे, दोनदा तडीपारचा प्रस्ताव अशी पाश्र्वभूमी चोपडा भाजपच्या शहराध्यक्षाची आहे त्याला वाचवितांना यांना काही वाटत नाही का? जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी जिल्हा प्रशासनावर आपली दहशत पसरवून ठेवली आहे. ती कमी झाली पाहिजे म्हणून सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी एकजूट व्हावे असे आवाहनही आमदार पाटील यांनी केले.

भाजप शहराध्यक्षाकडून पोलीस निरीक्षकास मारहाण

पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांना धारेवर धरतांना आमदार पाटील म्हणाले की, पोलीस अधीक्षकांनी नजन पाटील यांच्या सारख्या निर्भीड अधिकाऱ्यांची पाठ थोपटली पाहिजे होती. अशी अपेक्षा असतांना अवैध धंदे वाढल्याचा ठपका किसन पाटील यांच्यावर ठेवण्यात आला हे दुर्दैव आहे. यामुळे जिल्ह्यातील पोलीस हवालदिल झाले आहेत. एकीकडे पिंपळगाव हरेश्वरच्या निष्क्रीय एपीआयची बदली व्हावी म्हणून मला स्वतः आंदोलन करावे लागले आणि दुसरीकडे किसन पाटील यांच्या सारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याची तात्काळ बदली केली जाते एवढा विरोधाभास कसा असू शकतो असा प्रश्न आमदार पाटील यांनी उपस्थित केला.

गृहराज्यमंत्र्यांना निवेदन देणार
या प्रकरणी आपण सोमवार पर्यंत पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांना निवेदन देणार आहोत. तसेच गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांना देखील निवेदन देणार असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली. गरज भासल्यास गृहमंत्रीपद सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांना देखील निवेदन देणार आहेत.