
धनुष्यबाण कुणाचा? मूळ शिवसेनेचा की बंडखोर गटाचा? याबाबत लवकरच निर्णय येण्याची शक्यता आहे. याविषयी राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “काहीही झालं तरी धनुष्यबाण हे चिन्ह उद्धव ठाकरेंकडेच राहणार”, असा विश्वास मिटकरी यांनी व्यक्त केला आहे.
ते म्हणाले की धनुष्यबाण या विषयावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच अधिकार होता, आहे आणि यापुढेही राहील. न्यायालयाने देणंही बाजू ऐकून घेतल्या असतील आणि निकाल दिला नसेल. तरी आम्हाला वाटतं की उद्धव ठाकरेंकडेच धनुष्यबाण हे चिन्ह राहील. न्यायालय त्यावर योग्यतो निकाल देईलच. मात्र शिवसेनेची एक आचारसंहिता आहे. त्यालाही महत्व आहे. त्यामुळे धनुष्यबाण ठाकरेंकडेच राहील, असं ते म्हणाले.
यावेळी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधताना ते म्हणाले की, शिंदे सरकारचे 100 दिवस पूर्ण झालेत. मी शेतकरी म्हणून याकडे पाहतो. 100 दिवसात शेतकऱ्यांच्या बाजूने कोणता निर्णय झाला हे यांनी छातीवर हात ठेवून सांगावे. अजूनही शेतकऱ्याला कोणतीही मदत मिळालेली नाही. आता 100 रुपयात धान्य देतायत. पण शेतकरी यात समाधानी नाही, असे मिटकरी म्हणाले.
या सरकारचे 100 दिवस वाया गेले आहेत. नवरात्र, दहीहंडी, गरबा यातच ते नागरिकांना गुंतवून ठेवत आहेत. पण इथले रोजगार का गेले? इथल्या शेतकऱ्याला मदत का मदत मिळाली नाही? याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. या सरकारच्या कार्यकाळावर शेतकरी नाखूश आहे. ज्या राज्यात शेतकरी नाखूश असेल किंवा उद्विग्न असेल तो राजा किंवा ते राज्य जास्त दिवस टिकत नसतं, असं मिटकरी म्हणाले.
बाळासाहेबांपासून जो मराठी माणूस दसऱ्याला सभा ऐकायला यायचा तोच मुंबईतला मराठी माणूस उद्धव ठाकरेंच्या सभेला मेळाव्याला आला होता. ती बाहेरून आणलेली लोकं नव्हती. काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक गेले असतील तरी आम्ही आहोतच सोबत. पण भाड्याने जमवलेल्या गर्दीपेक्षा महाराष्ट्रातली लोकं उद्धव ठाकरेंसोबत होती. तीच मुंबई महापालिकेत परिवर्तनाची नांदी ठरेल, असे म्हणत त्यांनी शिंदेगट आणि भाजपवर निशाणा साधला.






























































