डोक्यावर कलश घेत शिवसेनेचे आंदोलन, गांधीनगर पाणी योजना वेळेत पूर्ण करण्याची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गांधीनगरसह 13 गावांसाठीची सुधारित गांधीनगर प्रादेशिक नळपाणी योजना वेळेत पूर्ण करावी, या मागणीसह योजनेतील त्रुटी, तसेच सध्या होत असलेला अपुरा पाणीपुरवठय़ासंदर्भात आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने येथील जीवन प्राधिकरण कार्यालयात डोक्यावर कलश आणि पाण्यात भिजलेल्या चलनी नोटा घेऊन लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.

दरम्यान, पूर्वकल्पना देऊनही जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अमित पाथरवट कार्यालयात उपस्थित नसल्याने शिवसैनिक उपअभियंता प्रभाकर गायकवाड यांना धारेवर धरत निवेदन दिले. निवेदनात म्हटले की, जीवन प्राधिकरणाच्या वतीने गांधीनगरसह 13 गावांसाठी गांधीनगर नळपाणी योजना मंजूर झाली आहे. या योजनेचे काम हैदराबाद येथील एका खासगी कंपनीकडून 7 नोव्हेंबर 2022पासून सुरू करण्यात आले आहे. या योजनेसाठी एकूण 343 कोटी 68 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. संबंधित कंपनीने 27 महिन्यांत काम पूर्ण करावयाचे असताना एक वर्ष झाले तरी केवळ या योजनेचे 20 टक्केच काम झाले आहे. तसेच या योजनेसाठी गावाअंतर्गत बसविलेल्या पाइपलाइनला मोठय़ा प्रमाणात गळती लागली आहे. त्यामुळे 14 गावांत अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांतून तीक्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, ही योजना पूर्ण होईपर्यंत या गावांना जीवन प्राधिकरणाने स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी वेगळी सोय करावी, तसेच या नवीन योजनेचे काम करणाऱया संबंधित खासगी कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा. तसेच या नळपाणी योजनेची देखरेख करणाऱया अधिकाऱयांचे त्वरित निलंबन करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, अवधूत साळोखे, पोपट दांगट, विराज पाटील, दत्ता पाटील, अरुण अब्दागिरे, दीपक पाटील, दीपक रोडे, संदीप भिलवडे, सागर पणतोजी, स्मिता सावंत आदी शिवसैनिक उपस्थित होते.