
नवनिर्वाचित खासदारांच्या शपथविधी वेळी लोकसभेत महाराष्ट्राचा आवाज घुमला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नऊ शिलेदारांनी मराठीतून शपथ घेतली. महाराष्ट्रातील बहुतांशी खासदारांनी ‘जय हिंद जय महाराष्ट्र, जय शिवराय’ अशा घोषणा दिल्या. विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या खासदारांनी संविधानाची प्रत हातात घेऊन शपथ घेतली.
18व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सोमवारपासून सुरू आहे. पहिल्या दिवशी 266 खासदारांचा शपथविधी झाला. तर उर्वरित खासदारांचा शपथविधी आज दुसऱया दिवशी झाला. बहुसंख्य खासदारांनी ईश्वराचे नाम स्मरून शपथ घेतली, तर काही खासदारांनी ‘सत्यनिष्ठा प्रतिज्ञा’ घेतली.
– केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियूष गोयल तसेच प्रणिती शिंदे, प्रशांत पाडोळे, गावाल पडवी, अनुप धोत्रे यांच्यासह नऊ जणांनी हिंदीतून शपथ घेतली.
नीलेश लंके यांची इंग्रजीतून शपथ
नगर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी इंग्रजीतून शपथ घेऊन भाजपचे पराभूत उमेदवार सुजय विखे यांना सणसणीत चपराक लगावली. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सुजय विखे यांनी नीलेश लंकेंवर टीका करताना ‘माझ्यासारखं फाड फाड इंग्रजी बोलून दाखवल्यास उमेदवारी अर्ज मागे घेईन’ असे आव्हान दिले होते. दरम्यान, संसदेत पहिल्यांदाच बोलताना इंग्रजीत शपथ घेतली आणि ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, राम कृष्ण हरी’ अशी घोषणाही दिली.
‘जय हिंद! जय महाराष्ट्र!’चा नारा
शिवसेना नेते अरविंद सावंत, अनिल देसाई यांच्यासह संजय जाधव, राजाभाऊ वाजे, नागेश पाटील-आष्टीकर, संजय दिना पाटील, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे यांनी मराठीतून शपथ घेतली. ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय’चा नारा दिला. तसेच श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, धैर्यशील मोहिते-पाटील, डॉ. शिवाजीराव काळगे, बजरंग सोनवणे, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर, सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे, भास्कर भगरे, कल्याण काळे, अमर काळे, बळवंत वानखेडे, शोभा बच्छाव आदी महाराष्ट्रातील 36 खासदारांनी मराठीतून शपथ घेतली.
इंडिया आघाडीच्या खासदारांच्या हातात संविधानाची प्रत
संविधान रक्षणाच्या मुद्दय़ावरून इंडिया आघाडीचे खासदार पहिल्या दिवसापासून आक्रमक असल्याचे सोमवारी दिसले. आजही काँग्रेस नेते राहुल गांधींसह इंडिया आघाडीच्या खासदारांनी संविधानाची प्रत हातात घेऊन शपथ घेतली. सर्व खासदारांच्या हातात संविधानाची प्रत होती.
ओवेसी यांनी दिली ‘जय पॅलेस्टाईन’ची घोषणा
एमआयएमचे नेते, हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी ऊर्दू भाषेत शपथ घेतली. शपथ पूर्ण करताच ‘जय भीम’, ‘जय मीम’, ‘जय पॅलेस्टाईन’ अशी घोषणा दिली. ‘जय पॅलेस्टाईन’ घोषणेला भाजप खासदारांनी आक्षेप घेतला. आठ महिन्यांपासून इस्त्र्ाायल-पॅलेस्टाईन संघर्ष सुरू आहे. संसदेत ओवेसी यांनी पॅलेस्टाईनची बाजू घेतली.
संजय जाधव यांनी दिली ‘जय भीम’ची घोषणा
शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी मराठीतून शपथ घेतली आणि ‘जय भीम’ची घोषणा दिली. या वेळी इंडिया आघाडीच्या खासदारांनी बाके वाजवून संजय जाधव यांचे अभिनंदन केले.




























































