
पसरणी घाटात एसटी महामंडळाची शिवशाही बस आणि खासगी लक्झरी बस यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 30 प्रवासी जखमी झाले. सर्व जखमींवर वाई आणि पाचगणीतील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. चार प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे. खासगी लक्झरी बसमध्ये लग्नाचे वऱहाड होते.
पाचगणीहून लग्नाचे वऱहाड घेऊन खासगी बस पुण्याला जात होती. पसरणी घाटात बसचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. पसरणी घाटात नागेवाडी वळणावर खासगी बसने पुण्याहून येणाऱ्या शिवशाही बसला समोरासमोर जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर लक्झरी बस संरक्षक कठडय़ावर चढून रस्त्यावर उलटली. यात 30 प्रवासी जखमी झाले. संरक्षक कठडय़ाच्या दुसऱ्या बाजूला दोन हजार फूट खोल दरी होती. सुदैवाने बस रस्त्यावर उलटल्यामुळे मोठी हानी टळली. अपघातानंतर घाटात दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सुमारे तीन तास वाहतूक ठप्प होती. पोलिसांच्या अथक प्रयत्नांनंतर वाहतूक सुरळीत झाली.


























































