
बिहारमधील सिवान जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. एका भोजन सोहळ्याप्रसंगी पिण्याच्या पाण्याच्या किरकोळ कारणावरून दोन तरुणांमध्ये वाद झाला. त्यांच्यातील वादावादी वाढल्याने एका तरुणाने दुसऱ्या तरुणावर गोळी झाडली. त्यात तो जखमी झाला आहे. गोळीबार करणाऱ्या तरुणाचा पोलीस शोध घेत आहेत.
बिहारमधील सिवान जिल्ह्यातील अगु छपरा गावात बुधवारी रात्री ही घटना घडली आहे. या गावात राहणाऱ्या केदार चौहान यांच्या मुलीच्या विवाहानिमित्त भोजन समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभात आलेले विशाल आणि अभिषेक यांच्यात पाणी पिण्यावरून वादविवाद सुरू झाला. त्यांच्यातील वादावदी वाढली. त्यावेळी विशालने त्याच्याकडे असलेली बंदूक काढून अभिषेकला धमकावले. दोघेही एकमेकांवर तुटून पडले. त्या झटापटीत विशालने गोळीबार करण्यास सुरुवात केली.
विशालने केलेल्या गोळीबारात अभिषेत जखमी झाला आहे. त्याच्या हात आणि कानाला गोळी लागली. गोळीबारानंतर श्रीनगर येथे राहणारा संजीत या भोजन समारंभाला आला. त्याने हवेत गोळ्या झाडून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. गोळ्यांचा आवाज ऐकून गावकरी भोजन समारंभ सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी जखमी झालेल्या अभिषेकला रुग्णालयात दाखल केले.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच सिवान नगर ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली. पाणी पिण्यावरून वादविवाद झाल्याने आरोपीने गोळीबार केला. आरोपींची ओळख पटली असून आरोपींना पकडण्यासाठी ठिकठिकाणी छापा घालत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.






























































