
‘भाजप नेत्यांवर ‘ईडी’ कारवाई दाखवा, एक लाख रुपये मिळवा’, असा फलक जत बसस्थानकासमोर लावण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना ‘ईडी’ची नोटीस आल्याच्या निषेधार्थ युवक राष्ट्रवादी काँग्रेसकडून हा फलक लावण्यात आला आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांना ‘ईडी’ने नोटीस बजावली आहे. या पार्श्वभूमीवर युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जतमध्ये बसस्थानकासमोर दर्शनी भागात फलक लावण्यात आला आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. या फलकाबाबत प्रतिक्रिया देण्यास भाजप कार्यकर्ते टाळाटाळ करीत होते.
सोशल मीडियावर फलकाचा धुमाकूळ
माजी मंत्री जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीच्या जत तालुक्यातील कार्यकर्त्यांनी फेसबुक, व्हॉट्सऍप स्टेटसवर फलकाचा फोटो टाकून भावना व्यक्त केल्या आहेत. दिवसभर या फलकाची व सोशल मीडियावर नेटकऱयांमध्ये चर्चा सुरू होती. ‘ईडी’ची भीती प्रत्येक विरोधी बाकावरील नेत्यांना आहे. मात्र, भाजपला का नाही, असा सवाल नेटकऱयांनी केला आहे.
भाजपकडून सुडबुद्धीने कारवाई
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपच्या चुकीच्या धोरणावर आवाज उठवला. त्यामुळेच भाजपने सुडबुद्धीने इडीच्या माध्यमातून त्यांना चौकशीत अडकविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यात भाजप यशस्वी होणार नाही, असे युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष स्वप्नील शिंदे यांनी सांगितले.

























































