श्री समर्थला मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खोचा दुहेरी मुकुट

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबई खो-खो संघटना आयोजित आणि लायन्स क्लब ऑफ माहीम पुरस्कृत मुंबई जिल्हा अजिंक्यपद कुमार, मुली खो-खो स्पर्धेत दादरच्या श्री समर्थ व्यायाम मंदिर संघाने मुले आणि मुलींच्या गटाचे जेतेपद पटकावत दुहेरी मुकुट मिळवण्याचा पराक्रम केला

कुमार गटांच्या अंतिम सामन्यात श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादर विरुद्ध सरस्वती स्पोर्टस् क्लब, माहीम हा सामना (06-08-07-05) 13-13 असा समान गुण असताना पंचांच्या निर्णयावर नाखुशी दाखवत सरस्वती स्पोर्टस् क्लब यांनी डाव सोडला त्यामुळे पंचांनी श्री समर्थाला विजयी घोषित केले. बरोबरीचा 7 वा गुण सामना संपण्यास 2 सेकंद राहिले असताना श्री समर्थच्या जयेश नेवरेकर याने मारला आणि सामना बरोबरीत आला. मात्र बरोबरीच्या गुणाबाबत पंचांच्या निर्णयावर नाखुशी दाखवत सरस्वती स्पोर्टस् क्लब यांनी डाव सोडल्याने जादा डाव न खेळवता श्री समर्थला विजय बहाल करण्यात आला.

मुलींच्या अंतिम सामन्यात श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादर या संघाने शिवनेरी सेवा मंडळ, दादर या संघाचा (05-05-08-05) 13-10 असा तीन गुणाने पराभव केला. मध्यंतराला सामना समान गुणांवर होता. मात्र मध्यंतरानंतर श्री समर्थाच्या मुलींनी धारधार आक्रमण करत 8 गुण वसूल करत सामन्यावर मजबूत पकड मिळवली.

या स्पर्धेचे पारितोषिक वितरण लायन्स क्लबच्या डिस्ट्रिक्ट 21 चे खजिनदार संजय चुरी आणि लायन्स क्लब ऑफ माहीमचे अध्यक्ष हर्षद सोनावाला यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी लायन विश्वास महाजन, लायन लेडी विनया तोरस्कर, लायन बाळ तोरस्कर, सुनील भागवत, राजू देसाई, मुंबई खो-खो संघटनेचे उपाध्यक्ष विकास पाटील, प्रमुख कार्यवाह ऍड.अरुण देशमुख, सहकार्यवाह श्रीकांत गायकवाड आणि सुरेंद्र विश्वकर्मा हे मान्यवर उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या