अभिनयाच्या वाटेवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनयक्षमता लपून राहात नाही. लोकेश गुप्ते यांची मुलगी शुभवी गुप्ते हीदेखील नकळत सिनेमाविश्वात ओढली गेली आहे.

अभिनयाची आवड होतीच. त्यामुळे काही नाटकांमध्ये कामंही केलीत, पण सिनेमात करीयर करायचं की नाही हे अद्याप ठरवलेलं नसतानाच शुभवीला ‘एक सांगायचंय’ या सिनेमात बाबांनी एक छोटीशी भूमिका करायला सांगितली. म्हणून मला ती नाकारता आली नाही, असं छोटीशी, पण होतकरू अभिनेत्री शुभवी लोकेश गुप्ते सांगत होती. तिच्या वडिलांचं दिग्दर्शन, लेखन आणि संकलन असलेल्या या सिनेमात तिने एक भूमिका केली आहे.

आता वडिलांच्याच चित्रपटात भूमिका म्हटलं म्हणजे खरं तर मज्जा… त्यात आईदेखील त्याच सिनेमात वेशभूषा सांभाळत होती. म्हणजे सातवीत शिकणाऱ्या शुभवीसाठी घरात काय आणि सेटवर काय… वातावरण घरच्यासारखंच असणार… अशी परिस्थिती होती खरी, पण शुभवीला मात्र तसा अनुभव आलेला नाही. तिच्याकडून काही चूक झाली तर दिग्दर्शक म्हणून लोकेश गुप्ते तिलाही ओरडायचे. एवढं साधं तुला येत नाही म्हणून खेकसायचेसुद्धा… बाबांचं हे जरा वेगळंच रूप आपण सेटवर पाहिल्याचं शुभवी नमूद करते. पण सेटवरील इतर अभिनेते तिला समजावत होते. असा अभिनय कर… यावेळी तू असं केलं पाहिजेस वगैरे… त्यामुळे ही भूमिका करायला सोपी झाल्याचं ती सांगते. के. के. मेनन आणि राजेश्वरी सचदेव पद्मावती राव, मिलिंद फाटक, अजित भुरे, विनीत शर्मा, शाल्व किंजवडेकर, हर्षिता सोहल, विभव राजाध्यक्ष, अभिजित अमकर, सचिन साळवी या सर्वांनीही सेटवर खूप खूप मदत केल्याचं सांगतानाच या सर्व सेटवरील कलाकारांच्या मदतीमुळेच पहिल्याच चित्रपटात काम करायला खूपच मजा आल्याचं ती स्पष्ट करते.

पदार्पणाबाबत आणखी सांगताना शुभवी म्हणते, ‘चित्रपटात माझ्याच वयाच्या एका मुलीची भूमिका आहे, हे मला माहीत होतं. पण मी तो रोल करते असं बाबांना मी कधी सांगितलं नाही. पण एकदा अचानक बाबाच घरी येऊन मला म्हणाले, माझ्या सिनेमात काम करशील? मग त्यांनी माझी ऑडिशनही घेतली. मगच त्यांनी मला हा रोल करू दिला, असं ती म्हणते.