एल निनोची पुनरागमनाची चाहूल; मान्सून, शेती आणि अर्थव्यवस्थेसमोर नवे आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरातील हवामान तज्ज्ञांचे लक्ष पुन्हा एकदा ‘एल निनो’ कडे लागले आहे. पॅसिफिक महासागरातील तापमानातील बदलांमुळे निर्माण होणारी ही घटना यंदा जागतिक हवामानावर मोठा प्रभाव टाकू शकते. विशेषतः हिंदुस्थानसारख्या मान्सूनवर अवलंबून असलेल्या देशांसाठी एल निनो चिंतेचा विषय ठरत आहे. एल निनो ही मध्य आणि पूर्व पॅसिफिक महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यपेक्षा वाढल्यावर निर्माण होणारी नैसर्गिक हवामान प्रक्रिया आहे. या बदलामुळे वातावरणातील वाऱ्यांचे स्वरूप बदलते आणि त्याचा परिणाम जगभरातील पर्जन्यमान, तापमान आणि वादळांच्या हालचालींवर होतो.

याशिवाय, देशातील अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा आणखी वाढण्याचा अंदाज आहे. आधीच उष्णतेच्या लाटांचा सामना करणाऱ्या राज्यांसाठी ही परिस्थिती अधिक आव्हानात्मक ठरू शकते. जलस्रोतांवरही ताण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, एल निनो हा केवळ हवामानातील बदल नसून त्याचे परिणाम शेती, अर्थव्यवस्था, जलव्यवस्थापन आणि अन्नसुरक्षेवरही दूरगामी असतात. त्यामुळे आगामी महिन्यांमध्ये हवामानातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. असे वृत्त एबीपी न्यूज ने दिले आहे.

हवामान अभ्यासकांच्या मते, एल निनो सक्रिय झाल्यास अनेक प्रदेशांमध्ये पावसाचे प्रमाण कमी होऊ शकते, तर काही भागांत अतिवृष्टीची शक्यता वाढते. उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र होण्याबरोबरच जंगलातील आगी आणि दुष्काळाचे संकटही गडद होऊ शकते. हिंदुस्थानच्या दृष्टीने पाहता, एल निनोचा सर्वाधिक परिणाम नैऋत्य मान्सूनवर होण्याची शक्यता असते. मान्सून कमकुवत राहिल्यास शेती क्षेत्राला फटका बसू शकतो. पिकांचे उत्पादन घटल्यास अन्नधान्याच्या किमती वाढण्याची शक्यता असून त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ शकतो.