
सामना प्रतिनिधी। सिंधुदुर्ग
ओरोस येथे महामार्ग चौपदरीकरण काम करतेवेळी पाईप लाईन फुटल्याने ‘सदानंद नगर’ येथील 20 कुटुंबीयांना गेले दहा दिवस नळयोजनेच्या पाण्यापासून वंचित राहावे लागले आहे. येथील रहीवाशांना अन्य ठिकाणी जावून पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे ही पाईप लाईन सुरळीत करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी ओरोस ग्रामपंचायतकडे केली आहे. मात्र ग्रामपंचायतीकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
जिल्ह्य़ात सध्या जोरदार महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. पुलासाठी खोदकाम करताना अनेक ठिकाणी पाईप लाईन फुटत आहेत. परिणामी तेथील ग्रामस्थांना पाण्याअभावी त्रास सहन करावा लागत आहे. हा मुद्दा जिल्हा परिषद सभांमधून वेळोवेळी उपस्थित करण्यात आला होता. मात्र त्यावर चर्चे व्यतिरिक्त काहीच साध्य झाले नाही.
सध्या या समस्येचा सामना ओरोस भवानी मंदिर नजिक राहणाऱ्या’ सदानंद नगर येथील रहीवाशांना करावा लागत आहे. पुलाचे काम करत असताना पाईप लाईन तुटल्याने ग्रामपंचायतींकडून सदानंद नगर येथे होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. गेले दहा दिवस येथील ग्रामस्थ या समस्येला सामोरे जात आहे. ही पाइप लाईन सुरळीत करावी यासाठी येथील रहिवासी ग्रामपंचायतीमध्ये खेटे मारत आहेत. मात्र पुढे कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
































































