अक्षय कुमार अडचणीत, विशेष तपास पथकाकडून कसून चौकशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, चंदीगड

अभिनेता अक्षय कुमार हा अडचणीत सापडला असून त्याची पंजाबमधील विशेष तपास पथकाने बुधवारी कसून चौकशी केली आहे. शीख धर्मियांचा पवित्र ग्रंथ असलेल्या गुरु ग्रंथ साहेबच्या अपमानानंतर पंजाबमध्ये हिंसाचार भडकला होता. या हिंसाचारामध्ये दोघांचा जीव गेला होता. या हिंसाचाराला जबाबदार असलेल्या बाबा राम रहीम याला माफी मिळवून देण्यात अक्षय कुमारने मध्यस्थी केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती रणजित सिंग यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमण्यात आला होता. या आयोगाच्या अहवालात अक्षय कुमारबाबत गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले होते. २० सप्टेंबर २०१५ रोजी अक्षय कुमारने त्याच्या घरी पंजाबचे तत्कालीन उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल आणि बाबा राम रहीम यांची भेट घडवून आणली होती असं अहवालात म्हटलंय. या बैठकीनंतरच पंजाबमध्ये राम रहीमचा चित्रपट पंजाबमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय झाला होता.

नेमकं प्रकरण काय आहे?
3 वर्षांपूर्वी पंजाबमधील बहीबल कलां भागामध्ये पवित्र ग्रंथ असलेल्या गुरु ग्रंथ साहेबचा अपमान झाल्याने हिंसा भडकली होती. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर गोळीबार केला होता ज्यात दोन नागरिकांचा मृत्यू झाला होता. काँग्रेसचं सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले होते. हा हिंसाचार बाबा राम रहीमने भडकवल्याचा आरोप आहे. त्याला या प्रकरणातून माफी मिळावी यासाठी अक्षय कुमारने त्याच्या घरी सुखबीरसिंग बादल आणि बाबा राम रहीम यांच्यात चर्चा घडवून आणल्याचा अक्षय कुमारवर आरोप आहे. अक्षय कुमारने मात्र त्याच्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे.

अक्षय कुमारला विचारण्यात आलेले प्रश्न

  • तुम्ही सुखबीरसिंग बादलना भेटला होता का ?
  • तुम्हाला सुखबीरसिंग बादल मुंबईत भेटले होते का ?
  • राम रहीमसोबत तुम्ही काम केलंय का ?
  • राम रहीमला भेटलेलात का ?
  • तुम्हाला माहिती होतं का की राम रहीम हा जुहूमध्ये रहात होता ?
  • राम रहीमने तुमच्याशी संपर्क साधला होता का ?