
सामना प्रतिनिधी, मुंबई
शिवसेनेने दिलेल्या दणक्याबरोबरच गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी शुक्रवारी रेल्वेच्या अधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या बैठकीनंतर ‘त्या’ सहा जलद लोकल शनिवारपासून पूर्ववत जोगेश्वरी रेल्वे स्थानकावर थांबविण्यात येतील असे आश्वासन पश्चिम रेल्वेच्या विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांनी दिले.
1 नोव्हेंबरपासून पश्चिम रेल्वेने जाहीर केलेल्या नवीन रेल्वेच्या वेळापत्रकात ऐन गर्दीच्या वेळी जोगेश्वरी रेल्वे स्थानकात थांबणाऱया सहा लोकल रद्द केल्या. यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता. यासंदर्भात शिवसेनेच्या नगरसेवकांनी तत्काळ जोगेश्वरी रेल्वे स्थानकातील रेल्वे मास्तरची भेट घेतली होती. याप्रश्नी रेल्वे अधिकाऱयांसमवेत तत्काळ बैठक घ्यावी अशी विनंती त्यांनी स्थानिक आमदार व राज्यमंत्री वायकर यांना केली. त्यानुसार आज वायकर यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी बैठक घेतली. या बैठकीला शिवसेनेचे नगरसेवक अनंत नर, सदा परब, प्रवीण शिंदे तसेच पश्चिम रेल्वेच्या विभागीय रेल्वे विभागातील अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत घेतलेले अन्य निर्णय
जोगेश्वरी फलाट क्रमांक 1 व 2 यांच्या ब्रिज व फलाटाच्या रुंदीकरणास मंजुरी. काम लवकरच सुरू होणार.
हार्बर लाइनसाठी फलाट क्रमांक 6 व 7 यांचेदेखील काम व त्यात पश्चिम रेल्वेचा पादचारी पूल जोडण्याचेही काम हाती घेणार.
या सहा जलद लोकल थांबणार
सकाळी – 8.15
सकाळी – 8.24
सकाळी – 8.44
सकाळी – 9.05
सकाळी – 9.36
सकाळी – 9.59


























































