नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील धामणा येथील स्फोटकांच्या कारखान्यात आज दुपारी झालेल्या भीषण स्फोटात सहा कामगारांचा मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना आज दुपारी एकच्या सुमाराला घडली. मृतांमध्ये पाच महिलांचा समावेश आहे. फटका वातीचे रिल्स बनवताना मशीनमध्ये अतिउष्णता निर्माण झाल्याने हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे.
धामणा येथील चांमुडी एक्सपोलसिव्हच्या न्यू मायक्रो प्लांट (वात बनवण्याचे काम करण्याचे युनिट) मध्ये फटाक्यांच्या दारूकामाचे 31 रिल होते. हे रिल्स मशीनवर पॅकिंग होत असताना अतिउष्ण तापमानामुळे त्याचा स्फोट झाला. यात प्रांजली मोदरे (22), प्राची फलके (19), वैशाली क्षीरसागर (20), मोनाली अलोणे (25), शीतल चटप (30), पन्नालाल बंदेवार (60) यांचा मृत्यू झाला तर श्रद्धा पाटील (22), प्रमोद चव्हारे (25), दानसा कोल्हे हे जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारार्थ नागपुरातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. कारखान्यांच्या या युनिटमध्ये 18 कामगार काम करीत होते, मात्र जेवणाची वेळ झाल्याने काही कामगार जेवणासाठी बाहेर गेले होते. त्यामुळे ते सर्व कामगार बचावले.
कारखान्यावर कठोर कारवाई करा!
मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना जास्तीत जास्त मोबदला मिळावा तसेच कामगारांसाठी सुरक्षेची साधने उपलब्ध करून न देणाऱया कंपनीविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. दरम्यान, मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना 25 लाख तर कंपनीकडून 50 लाखांची मदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
संतापलेल्या कामगारांनी केले आंदोलन
कारखान्यात कामगारांच्या सुरक्षेची कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नव्हती. कामगारांनी कारखाना प्रशासनाकडे सुरक्षा साधनांबाबत वेळोवेळी मागणी केली होती, मात्र या मागणीकडे दुलर्क्ष करण्यात आले होते. त्यामुळे आजच्या घटनेनंतर कामगारांमध्ये कंपनीविरूद्ध संतापाची लाट पसरली आणि कामगारांनी प्रवेशद्वारावर आंदोलन केले.