सहा वर्षांच्या चिमुरडीचा बळी, अवयवही काढून नेले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

दिवाळीची रात्र ही अमावस्येची रात्र असते. सर्वत्र दीपोत्सव सुरू असताना काही अंधश्रद्धाळू मात्र तंत्र मंत्र करण्यात गुंतलेले असतात. अशाच एका घटनेमध्ये सहा वर्षांच्या मुलीचा बळी दिल्याचं वृत्त आहे.

ही घटना उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे घडली आहे. येथील भदरस नावाच्या गावातून एक मुलगी बेपत्ता झाली होती. शनिवारपासून तिचा पत्ता लागत नव्हता.

तिचे कुटुंबीय रात्रभर तिचा शोध घेत होते. रविवारी सकाळी या मुलीचा छिन्नविछिन्न अवस्थेतला मृतदेह काली मातेच्या मंदिराजवळ आढळला.

या मुलीचे हात पाय लाल रंगाच्या आळत्याने रंगवले होते. तिच्या शरीरावर अनेक जखमा दिसत होत्या. एखाद्या धारदार हत्याराने तिची हत्या केली गेली असावी असा संशय आहे.

याहून गंभीर म्हणजे तिच्या शरीरातून फुप्फुस काढून घेण्यात आल्याचं आढळून आलं. तिचा मृतदेह आढळला तिथून जवळच तिचे कपडे, चपला आणि एक चीप्सचे पॅकेट आढळले आहे.

या मुलीचा बळी देण्यासाठी तिला फूस लावून पळविण्यात आलं असावं असं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलिसांनी मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरू आहे.