दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्रासाठी ‘बॅड न्यूज’ या वर्षीही कमी पाऊस!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

महाराष्ट्रातील 151 तालुके दुष्काळाने होरपळत असताना या वर्षीही कमी पाऊस पडण्याचा अंदाज ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने व्यक्त केला आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत महाराष्ट्रासह देशभरात सामान्यपेक्षा कमी म्हणजे सरासरीच्या केवळ 93 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही ‘बॅड न्यूज’ आहे. कमी पावसामुळे शेती पुन्हा संकटात सापडणार आहे. दरम्यान, कमी पावसामागे ‘अल-निनो’चा प्रभाव असल्याचे हवामानतज्ञांचे म्हणणे आहे.

‘स्कायमेट’च्या अंदाजानुसार सरासरी 93 टक्के पाऊस पडणार आहे. सरासरी 90 ते 95 टक्के पाऊस हा  सामान्यपेक्षाही कमी श्रेणीमध्ये येतो. देशात जून ते सप्टेंबर या काळात मान्सूनचा सरासरी 289 मि.मी. पाऊस होतो, मात्र यंदा फक्त 263 मि.मी. पाऊस होईल अशी भीती व्यक्त होत आहे.

‘अल-निनो’चा फटका बसणार

सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्यामागे ‘अल-निनो’चा प्रभाव हे कारण असणार आहे असे स्कायमेटचे सीईओ जतीन सिंह यांनी सांगितले. फेब्रुवारी महिन्यात स्कायमेटने वर्तविलेल्या अंदाजात ‘अल-निनो’बाबत भाष्य केले नव्हते. दरम्यान, केंद्र सरकारचा हवामान  विभागाचा अंदाज अद्याप आलेला नाही.

  • सामान्यपेक्षा कमी पावसाची 55 टक्के शक्यता
  • मुसळधार पाऊस (110 टक्के आणि त्यापेक्षा अधिक) – 0 टक्के शक्यता.
  • सामान्यपेक्षा जास्त पाऊस (सरासरीच्या 105 ते 110 टक्के) – 0 टक्के शक्यता.
  • सामान्य पाऊस (सरासरीच्या 96 ते 104 टक्के) – 30 टक्के शक्यता.
  • सामान्यपेक्षा कमी पाऊस (सरासरीच्या 90 ते 95 टक्के किंवा त्याहून कमी) – 15 टक्के शक्यता.

सलग दुसऱ्या वर्षी दुष्काळाचे संकट

सध्या संपूर्ण मराठवाडा, विदर्भासह राज्यातील 151 तालुक्यांना दुष्काळाच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. अनेक तालुक्यांमध्ये तीक्र पाणीटंचाई आहे. रब्बीचे पीकही घेता आलेले नाही. त्यामुळे जून ते सप्टेंबर 2019 मध्ये वरुणराजाची चांगली कृपा होईल, पाऊस चांगला बरसेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे, परंतु स्कायमेटचा अंदाज खरा ठरला तर मोठे संकट ओढवेल. सलग दुसऱ्या वर्षी दुष्काळाचा सामना करावा लागण्याची भीती आहे.