
सोलापूर शहराची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू असून, गेल्या दोन दिवसांपासून एकही रुग्ण आढळला नाही. शहरात अवघे नऊ रुग्ण ऑक्टिव्ह आहेत. शहरात साडेसहा लाखांपेक्षा अधिक नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातच कोरोनावर मात करण्यात सोलापूर शहराने आघाडी घेतली आहे.
राज्यात एकेकाळी कोरोनाचा हॉट स्पॉट ठरलेले सोलापूर शहर आता कोरोनामुक्तीच्या उंबरठय़ावर आहे. शहरात दररोज 700 ते 800 जणांची कोरोना टेस्ट होत असून, यात गेल्या काही दिवसांपासून एकही रुग्ण आढळत नाही. मृत्यूची संख्याही नाही. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱया लाटेत हॉट स्पॉट ठरलेले सोलापूर शहर ऐन सणासुदीतही कोरोनापासून दूर राहिल्याचे सकारात्मक चित्र आहे.
गेल्या आठवडाभरापासून एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळले नाहीत. जे उपचार घेत होते तेही बरे होऊन जात आहेत. सध्या शहरात अवघ्या नऊ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 4,62,348 जणांना पहिला डोस, तर 2,20,674 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. 6 लाख 40 हजार 503 जणांचे लसीकरणाचे उद्दिष्ट असून, आतापर्यंत 6 लाख 83 हजार 22 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. येत्या दोन दिवसांत शहर कोरोनामुक्त होईल. ही सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी ठरणार आहे.


























































