
सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरू असून, दिलासादायक घटना म्हणजे, वर्षभरापासून 10 तालुक्यांतील 73 गावांत अद्यापी एकही रुग्ण आढळलेला नाही. ही 73 गावे कोरोनापासून सुरक्षित आहेत.
सोलापूर शहर व जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्गाचा धुमाकूळ सुरू आहे. अनेक गावे कोरोनाने बाधित झाली आहेत. वर्षभरात 11 तालुक्यांत 50 हजारहून अधिक रुग्ण आढळले. ग्रामीण भागात जवळपास 1300 जणांचा मृत्यू झाला आहे. अशा स्थितीत 10 तालुक्यांतील 73 गावे कोरोनापासून दूर राहिली आहेत. जिल्ह्यात जवळपास 1088 गावे असून, 1015 गावांमध्ये आतापर्यंत कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची सजगता व गावकऱ्यांची सहकार्याची भूमिका यामुळे या 73 गावांत कोरोना अद्यापी पोहोचला नाही. यात दक्षिण सोलापूर तालुका 6, उत्तर सोलापूर 1, मंगळवेढा 2, करमाळा-सांगोला 2, पंढरपूर 5, बार्शी 7, मोहोळ 11, माढा 11, अक्कलकोट तालुक्यातील 26 गावांचा समावेश आहे.
ग्रामीण भागात झपाटय़ाने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. पंढरपूर, बार्शी, माळशिरस या तीन तालुक्यांत सर्वाधिक रुग्ण असून, माळशिरस तालुक्यातील जवळपास सर्वच गावांत रुग्ण आढळले आहेत. परंतु सीमेवर असलेल्या अक्कलकोट तालुक्यातील 26 गावे अद्यापि कोरोनामुक्त आहेत, ही दिलासा देणारी बाब आहे.


























































