
सोलापुरातील बहुतांश शाळांनी अग्निशमन यंत्रणेची परवानगी घेतली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहर आणि जिल्ह्यातील शाळांच्या संस्थाचालकांनी अग्निशमन यंत्रणेची परवानगी घेतलेलीच नसून, याकडे शिक्षणाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. शाळांमध्ये आगीची दुर्घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग येणार की काय, अशी विदारक स्थिती सोलापुरात पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांसाठी ज्या शाळांमध्ये मध्यान्न भोजन व्यवस्था आहे, त्या शाळांना तर अग्निशमन यंत्रणेची परवानगी घेणे गरजेचे आहे. मात्र, याचे गांभीर्य कोणालाही नाही.
सोलापूर शहरातील इंडियन मॉडेल स्कूल, पोतदार इंग्लिश मीडियम स्कूल, दयानंद लॉ कॉलेज, वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, लिट्ल फ्लॉवर, स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल या शाळांकडे अग्निशमन यंत्रणेची परवानगी आहे. मात्र, शेकडो शाळांनी अग्निशमन यंत्रणेची परवानगीच घेतलेली नाही. शासनाच्या ज्या शाळांमध्ये मध्यान्न भोजनाची व्यवस्था असते. त्या ठिकाणी घरगुती कापराचा गॅस असतो. अशा ठिकाणी सुरक्षेसाठी अग्निशमन यंत्रणेची व्यवस्था असणे गरजेचे आहे. बहुतांश शाळा-महाविद्यालयांमध्ये अग्निशमन यंत्रणाच नसल्याचे पहायला मिळते. याकडे प्रशासनही दुर्लक्ष करत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
सोलापूर शहरात शाळा व महाविद्यालयाच्या टोलेजंग इमारती आहेत. 15 मीटर किंवा 50 फुटांपेक्षा मोठी शाळेची इमारत असल्यास त्यांच्याकडे प्रत्येक मजल्यावर अग्निशमन यंत्रणा असणे गरजेचे आहे, पण अनेक शाळा व महाविद्यालयांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. काही दिवसांपूर्वी सोलापूर शहरातील एका उर्दू शाळेच्या इमारतीशेजारी मोठी आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच येऊन ही आग आटोक्यात आणली, अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. यावेळी या शाळेत शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
शाळा व महाविद्यालयांतील प्रयोगशाळांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची रसायने आणि स्पिरिट असते. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके दाखवताना या रसायनांचा व स्पिरिटचा उपयोग केला जातो. अनावधानाने प्रयोगशाळेत आग लागली तर आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन यंत्रणा असणे गरजेचे आहे. मात्र, प्रशासकीय अधिकारी किंवा शिक्षणाधिकाऱ्यांचे याकडे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे.
इमारतीमध्ये आपत्कालीन मार्गाची नितांत गरज
शाळा व महाविद्यालयांच्या इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर आपत्कालीन मार्ग असणे गरजेचे आहे. आगीच्या दुर्घटनेवेळी विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर पडता येईल, पण हा आपत्कालीन मार्ग शाळा व महाविद्यालयांच्या इमारतीत नाही. ज्यावेळी शाळेच्या इमारतीचे बांधकाम सुरू असते त्यावेळीच त्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. धोक्याची घंटा शाळा व महाविद्यालय प्रशासनाने परिसरात बसविणे आवश्यक आहे, पण याबाबत अनेकांना काहीच माहिती नाही. शाळा व महाविद्यालयांच्या या हलगर्जीपणावर प्रशासन गप्प आहे.


























































