
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी सोलापुरात नियुक्त केलेल्या 605 पैकी आठ कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचे परीक्षेनंतर स्पष्ट झाल्याने परीक्षार्थी व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये घबराट पसरली आहे. आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासन यांच्यातील समन्वयाअभावी हा प्रकार घडल्याने संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी आता कोणावर कारवाई करणार असा संतापजनक सवाल नागरिकांतून विचारला जात आहे. प्रशासनाने मात्र असा प्रकार घडला नसल्याचे सांगून हात झटकले आहेत.
सोलापूर शहर व जिह्याबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. ही परीक्षा 21 मार्च रोजी घेण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार ही परीक्षा सोलापुरातील 22 केंद्रांवर पार पडली. या परीक्षेसाठी पर्यवेक्षक व अन्य असे एकूण 605 कर्मचारी नियुक्त केले हेते. कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता समूहसंसर्ग वाढू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून नियुक्त केलेल्या सर्व कर्मचाऱयांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महापालिकेच्या जिजामाता हॉस्पिटलमध्ये सर्व कर्मचाऱयांचे स्वॅब घेण्यात आले. परीक्षा रविवारी असल्याने त्यांचे अहवाल शनिवारी सायंकाळपूर्वी प्राप्त होणे अपेक्षित होते; परंतु यातील अनेकांचे अहवाल आले नाहीत. त्यामुळे कोण पॉझिटिव्ह आणि कोण निगेटिव्ह हे कळू शकले नाही. अहवाल प्राप्त झालेले नसतानाही कर्मचाऱयांनी परीक्षेसाठी आपली सेवा बजावली. या परीक्षेसाठी एका वर्गात 24 विद्यार्थी होते. दरम्यान, बहुतांश कर्मचाऱयांचे अहवाल परीक्षेनंतर प्राप्त झाले. या अहवालातून धक्कादायक बाब समोर आली आहे. परीक्षेसाठी या बाधित कर्मचाऱयांमुळे समूहसंसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. या बाधित कर्मचाऱयांच्या संपर्कात आलेल्या विद्यार्थी व अन्य कर्मचाऱयांचा प्रशासनाला शोध घ्यावा लागणार आहे.
सेवा बजावल्याचे बाधितांचे म्हणणे
– महसूल विभागाने परीक्षा नियंत्रणासाठी ज्या कर्मचाऱयांची नियुक्ती केली होती ते कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याचे समजले. त्यांच्याशी संपर्क साधला असता परीक्षेपूर्वी आपल्या हाती चाचणीचा अहवाल प्राप्त झाला नाही. त्यामुळे नियुक्त केंद्रावर हजर होऊन सेवा बजावली होती. मात्र, परीक्षेनंतर कोरोना चाचणी पॉझिटिव्ह असल्याचे समजले, असे बाधितांनी सांगितले. त्यामुळे परीक्षा रविवारी असताना शनिवारी अहवाल प्राप्त करून देण्याची प्रशासनाची जबाबदारी होती. अहवाल का प्राप्त करून घेतले नाहीत? अहवाल नसतील तर कर्मचाऱयांना डय़ुटी दिलीच कशी? असे अनेक प्रश्न आता निर्माण होत आहेत.
एमपीएससी परीक्षेसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱयांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांचे अहवाल परीक्षेपूर्वीच प्राप्त झाले आहेत. बाधित आढळलेल्या कर्मचाऱयांना थांबवून आम्ही त्यांच्या जागी दुसऱया कर्मचाऱयांची नियुक्ती केली होती.
– भारत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी
































































