रेल्वे अभियंत्याच्या घरी वायरमननेच केली चोरी, साडेबारा लाखांचा मुद्देमाल जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर रेल्वे विभागातील एका इंजिनीयरच्या घरी चोरी केल्याप्रकरणी रेल्वे विभागातील वायरमनलाच पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीतील साडेबारा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

भाऊराव अर्जुन वाघमोडे (रा. आदिलनगर, विजापूर रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दमाणीनगरमधील सोनी सिटीमध्ये राहणाऱ्या रेल्वे विभागातील एका इंजिनीयरच्या घरी महिन्याभरापूर्वी दागिन्यांची चोरी झाली होती. या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस तपासादरम्यान बनावट चावीने घर उघडून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व टॅब चोरीला गेला होता.

दरम्यान, या चोरीच्या तपासादरम्यान पोलिसांनी सिद्धेश्वर मंदिर परिसरात एक इसम चोरीतील टॅब विक्री करण्यासाठी येणार असल्याची खबर मिळाली होती. सापळा रचून पोलिसांनी टॅबसह इसमाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असता तो रेल्वे इलेक्ट्रिक विभागात कार्यरत असलेला वायरमन भाऊराव वाघमोडे हा कर्मचारी निघाला. झडतीत त्याच्याकडे चोरीतील सुमारे साडेबारा लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आढळले. पोलिसांनी वाघमोडेला अटक करून दागिने जप्त केले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.