
ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यात्रेत सहभागी होणाऱया नंदीध्वजधारकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेणे आवश्यक असून, यात्राकाळात कोरोनाचे संक्रमण होऊ नये, यासाठी सिद्धेश्वरभक्तांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी, असे आवाहन मानकरी व सिद्धेश्वरभक्तांच्या बैठकीत करण्यात आले.
मानकरी हिरेहब्बूंच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत नंदीध्वजांचा सराव आणि या काळात होणाऱया पूजेबाबत चर्चा झाली. नंदीध्वज पूजेसाठी घरोघरी घेऊन जाण्यामुळे सरावासाठी वेळ कमी पडतो. सराव कमी होत असल्यामुळे यात्रेत मोठय़ा विसाव्यापर्यंत नंदीध्वज पेलणाऱयांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे पूजा कमी करून सराव करण्यावर भर द्या, कोरोनाचे नियम पाळूनच सराव करा, असे आवाहन मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी केले.
सराव करताना शिस्तीचे पालन करा, पारंपरिक पोशाख परिधान करा, असे ते म्हणाले. पंढरपूरच्या कार्तिकी यात्रेला परवानगी मिळाल्यामुळे जानेवारीत होणाऱया ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरांच्या यात्रेलाही परवानगी मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मात्र, यंदा दरवर्षीप्रमाणेच नंदीध्वजांची पूजा व्हावी, असा आग्रह मानकऱयांनी धरला. त्याला सर्वांकडून मान्यता देण्यात आली.
उद्योगपती कुमार करजगी यांनी यात्रेतील मानाच्या पहिल्या नंदीध्वजाच्या पट्टय़ा, कळस, तसेच योगदंडाला सोन्याचा मुलामा देण्यासाठी 15 तोळे सोने देणार असल्याचे जाहीर केले.
या बैठकीला आमदार विजयकुमार देशमुख, सुदेश देशमुख, सुधीर थोबडे, तम्मा मसरे, बाळासाहेब कुमठेकर, शिवानंद बनशेट्टी, संदेश भोगडे, सामनाथ मेंडके, बिपनी धुम्मा, सोमनाथ मेगाणे, रेवणसिद्ध माळी, महादेव माशाळ, मल्लिनाथ म्हेत्रे, कुमार शिरसी, मारुती बनसोडे, प्रकाश बनसोडे उपस्थित होते.


























































