सोलापूर विद्यापीठ परिक्षा उद्यापासून नियोजित वेळापत्रकानुसार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्या आदेशानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा सोमवारपासून (दि 6) नियोजित जाहीर अंतिम वेळापत्रकानुसार सुरू होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर यांनी दिली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या ऑक्टोबर, नोव्हेंबर-2022च्या विद्यापीठ आयोजित परीक्षा 23 जानेवारी 2023 पासून सुरू झाल्या होत्या. मात्र, महाविद्यालयीन व विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या परीक्षा कामकाजावर बहिष्कार आंदोलनामुळे 2 ते 4 फेब्रुवारी 2023 दरम्यानच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या. आता शासनाच्या आदेशानुसार 6 फेब्रुवारीपासून विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर अंतिम वेळापत्रकानुसार ज्या-त्या दिवसाची परीक्षा सुरू करण्यात येत असल्याचे परिपत्रक परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणपूर यांनी काढले आहे. याची माहिती संबंधित सर्व महाविद्यालये, संस्थाचालक व अधिविभाग प्रमुखांना कळविली आहे.

6 फेब्रुवारीपासून नियमितरीत्या वेळापत्रकानुसार होणाऱ्या परीक्षेसाठी संबंधित सर्व महाविद्यालये, विद्यापीठ संकुले व परीक्षा केंद्रप्रमुख आणि कर्मचाऱ्यांनी आवश्यक उपाययोजना करून परीक्षा विहित वेळेत पार पडतील, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना परीक्षा संचालक डॉ. गणपूर यांनी केली आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या वेळापत्रकानुसार परीक्षा द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

2 ते 4 फेब्रुवारीदरम्यानच्या परीक्षा नंतर होणार

महाविद्यालयीन व विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या बहिष्कार आंदोलनामुळे 2 ते 4 फेब्रुवारी दरम्यानच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्याने आता त्या परीक्षा नंतर होणार आहेत. त्या संदर्भात विद्यापीठ संकेतस्थळावर सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात येईल व त्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येईल, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर यांनी दिली.

आंदोलन मागे घेण्यास कर्मचाऱ्यांचा नकार

विद्यापीठ व महाविद्यालय कर्मचाऱ्यांच्या परीक्षांवर बहिष्कार आंदोलनाचा शुक्रवारी दुसरा दिवस होता. दरम्यान, महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी कर्मचाऱ्यांना आंदोलन मागे घेण्यास प्रवृत्त करावे; अन्यथा शिस्तभंगाची नोटीस बजवावी, अशा सूचना सर्व कुलगुरूंना दिल्या. त्यानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात व्यवस्थापन परिषद सभागृह येथे शुक्रवारी कुलसचिव, संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ आणि विभागीय सहसंचालक यांच्यासमवेत शुक्रवारी विद्यापीठ कर्मचारी संघटनेच्या सर्व प्रतिनिधींसमवेत बैठक झाली. त्यांनी परीक्षेवरील बहिष्कार मागे घेण्याची विनंती संघटनेला केली; परंतु कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासनाने ठोस निर्णय घेतल्याशिवाय आंदोलनाचे ठरलेले टप्पे मागे घेण्यास नकार देऊन सेवक संयुक्त कृती समितीद्वारे प्राप्त आदेशानुसार आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असे सोलापूर विद्यापीठ संघटनेचे अध्यक्ष सुनील थोरात यांनी सांगितले आहे.