
कोरोनामुळे या वर्षातील आयपीएल स्पर्धा हिंदुस्थानऐवजी यूएईमध्ये खेळवण्यात आली. मात्र 2021 अर्थातच पुढल्या वर्षी आयपीएल स्पर्धा हिंदुस्थानात खेळवण्यात येणार आहे. एप्रिल आणि मे या कालावधीतच ही स्पर्धा आयोजित करण्यात येईल, अशी माहिती बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांच्याकडून याप्रसंगी देण्यात आली. एका मीडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपले मत व्यक्त केले.
मायदेशातील मालिकेतील लढती कुठे होणार?
हिंदुस्थान-इंग्लंड यांच्यामधील मालिका हिंदुस्थानात खेळविण्यासाठी पाऊल उचलण्यात आले असले तरी कोरोनावर अद्याप लस आलेली नाही. त्यामुळे हिंदुस्थानातील सर्व ठिकाणी या मालिकेतील लढती खेळविण्यात येऊ शकत नाहीत. त्यामुळे कोलकाता, अहमदाबाद व मुंबई यांसारख्या ठिकाणी या मालिकेतील लढती होण्याची दाट शक्यता आहे. प्रत्यक्षात याबाबत अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.
इंग्लंडविरुद्धची मालिकाही मायदेशातच
हिंदुस्थानात 2021 च्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्ध मालिकेचे आयोजन करण्यात येणार आहे. हिंदुस्थान-इंग्लंड यांच्यामधील ही बहुप्रतिक्षित मालिकाही हिंदुस्थानात खेळविण्यात येणार आहे. तसेच रणजी स्पर्धाही हिंदुस्थानातच आयोजित करण्यात येणार आहे. हिंदुस्थानात खेळविण्यात येणाऱया सर्व स्पर्धा बायोबबल म्हणजेच सुरक्षित वातावरणात पार पडतील, असेही सौरभ गांगुली यांनी स्पष्टपणे सांगितले.
चार महिन्यांनंतर पुन्हा आयपीएल
आयपीएल स्पर्धा दरवर्षी एप्रिल ते मे या कालावधीत खेळवण्यात येते. पण कोरोनामुळे ही स्पर्धा यंदा यूएईमध्ये सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत खेळवण्यात आली. पुढल्या वर्षी ही स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार एप्रिल ते मे या कालावधीतच पार पडणार आहे. याचा अर्थ चार महिन्यांनंतर आयपीएलचा थरार तमाम क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळणार आहे.
लिलावाचे काय होणार…
सौरभ गांगुली यांच्याकडून आयपीएल पुढल्या वर्षी हिंदुस्थानात खेळवण्यात येईल असे संकेत देण्यात आले असले तरी दोन आयपीएलमध्ये अवघा चार महिन्यांचा कालावधी आहे. अशा परिस्थितीत खेळाडूंसाठी होणारा लिलाव केव्हा होईल हाही यक्षप्रश्नच आहे. तसेच चार महिन्यांच्या अल्प अवधीत संघ मालकांना मनाजोगते खेळाडू आपल्याकडे घेण्यासाठी योजना तयार करता येणार आहे का, हाही प्रश्न यावेळी निर्माण होतो आहे. पुढची आयपीएल संघ बदल न करता खेळवण्यात येऊ शकते. यावर बीसीसीआय कोणता निर्णय घेते हे पाहणे रंजक ठरणार आहे.
























































