फ्लोरिडातील लढतींना भिजवल्यानंतर आता पावसाने आपला निशाणा सुपर एटवर धरला आहे. कॅरेबियन बेटांवर उद्या बुधवारपासून सुरू होणाऱया सुपर एट लढतींवर पावसाचे संकट गहिरे झाल्यामुळे आयोजकही धास्तावले आहेत. सुपर एटच्या पहिल्या दिवशी यजमान अमेरिका विजयी चौकार ठोकणाऱया दक्षिण आफ्रिकेला धक्का देण्यासाठी सज्ज झाला आहे तर यजमान वेस्ट इंडीज आणि जगज्जेता इंग्लंड एकमेकांशी भिडतील.
ब्लॉकबस्टर लढतीला पावसाचा धोका
बुधवारपासून सुपर एटच्या 12 लढती कॅरेबियन बेटांवर खेळविल्या जाणार आहेत आणि हवामान खात्याने सर्व लढतींवर पावसाचे संकट असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. एवढेच नव्हे 24 जूनला ब्रिजटाऊन येथे हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारा ब्लॉकबस्टर सामना पावसात वाहून जाण्याची शक्यता आहे. यंदा पावसामुळे चार सामने रद्द करावे लागले आहेत आणि असाच फटका सुपर एटलाही बसला तर स्पर्धेचे सारे गणित बिघडू शकते. त्यामुळे आयोजकांनी सामना पावसात बुडू नये म्हणून आतापासूनच पावसाला रोखण्यासाठी देव पाण्यात बुडवून ठेवले आहेत.
अमेरिका जोशात
दक्षिण आफ्रिकेने साखळीतील चारही सामने जिंकले असले तरी त्यांना दोन सामन्यांत निसटते विजय मिळाले आहेत. त्यांच्या फलंदाजांना साखळीत सूरच सापडला नसल्यामुळे ते चिंतीत आहेत, पण चारही सामन्यात भेदक गोलंदाजी करणारा अमेरिका आफ्रिकन फलंदाजांना गुंडाळण्यासाठी जोरदार तयारी करतोय. आफ्रिकेचा संघ कागदावर मजबूत असला तरी अमेरिकेच्या कामगिरीने साऱयांचे डोळे विस्फारले आहे. परिणामतः ते धक्कादायक विजयाची नोंद करू शकतात.