
दक्षिण कोरियाचे विरोधी पक्षनेते ली जे-म्युंग यांच्यावर एका जाहीर सभेत जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. पत्रकारांशी बोलत असताना म्युंग यांच्या गळ्यावर चाकूने वार केले. म्युग जमिनीवर कोसळले होते. दिवसाढवळ्या अचानक झालेल्या या जीवघेण्या हल्लाने परिसरात खळबळ उडाली आहे.
म्युंग हे दक्षिण कोरियातील प्रमुख विरोधी पक्ष डेमोक्रेटिक पक्षाचे प्रमुख आहेत. बुसान येथील गैडियोक बेटावरील नवीन विमानतळाच्या बांधकामाच्या जागेला भेट देण्यासाठी ते आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना, एक अज्ञात व्यक्ती म्युंग यांच्याकडे ऑटोग्राफ मागण्यासाठी पुढे आला. यानंतर योग्य वेळ साधून त्याने म्युंग यांच्या गळ्यावर चाकूचे वार केले. हे पाहून लोक म्युंगच्या मदतीसाठी धावले, मात्र तोपर्यंत म्युंग जमिनीवर पडले होते.
घडलेल्य़ा प्रकारानंतर म्युंग यांना लगेचच उपचारांसाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. तसेच म्युंग यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरु करण्यात आली आहे.
























































