दक्षिणेकडील सुपरस्टार अभिनेते चिरंजीवी यांना कोरोनाची लागण, ट्विट करून दिली माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दाक्षिणात्य अभिनेता, सुपरस्टार चिरंजीवी यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः चिरंजीवी यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर ते घरात क्वारंटाईन झाले आहेत.

आगामी ‘आचार्य’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यापूर्वी 65 वर्षीय चिरंजीवी यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. आज त्यांचा अहवाल आला असून, चिरंजीवी यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहेत. चिरंजीवी यांनी याबाबत माहिती दिल्यानंतर सोशल मीडियावर चाहते त्यांच्या चांगल्या तब्येतीची आणि लवकर बरे होण्याची प्रार्थना करत आहेत.

चिरंजीवी यांचे ट्विट

अभिनेते चिरंजीवी यांनी ट्विटरवर पोस्ट लिहून माहिती दिली. ‘मी आचार्य चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करणार होतो, मात्र तत्पूर्वी करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत माझा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी तात्काळ स्वतःला सेल्फ क्वारंटाईन केले आहे. गेल्या 4 ते 5 दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना चाचणी करावी. माझ्या तब्येतीबाबत मी वेळोवेळी माहिती देत राहील’, असे ट्विट चिरंजीवी यांनी केले.

तेलंगणातील आकडा अडीच लाखांवर

दरम्यान, तेलंगणा राज्यात गेल्या 24 तासात 857 नवीन कोरोना रुग्ण आढळले असून रुग्णांचा आकडा 2 लाख 51 हजार झाला आहे. आतापर्यंत 2 लाख 30 हजार 568 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून सक्रिय रूग्णांची संख्या 19 हजार 890 आहे. राज्यात आतापर्यंत 1 हजार 381 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यू दर 1.5 टक्के आहे.