बटलरचा शतकी धमाका!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। साऊथम्पटन

जोस बटलरने 50 चेंडूंत झळकावलेल्या दमदार शतकाच्या जोरावर यजमान इंग्लंडने शनिवारी पाकिस्तानवर 12 धावांनी सनसनाटी विजय मिळवला आणि पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. 55 चेंडूंत 110 धावांची खेळी साकारणाऱया जोस बटलरची ‘सामनावीर’ म्हणून निवड करण्यात आली. दोन्ही डावांत मिळून 734 धावांचा पाऊस पडला.

फखर जमानची झुंज

इंग्लंडकडून मिळालेल्या 374 धावांचा पाठलाग करणाऱया पाकिस्तानला 7 बाद 361 धावा करता आल्या. सलामीवीर फखर जमानने 106 चेंडूंत 4 षटकार व 12 चौकारांसह 138 धावांची खेळी साकारली, पण त्याची झुंज अपयशी ठरली. बाबर आझमने 51 धावांची आणि असीफ अलीने 51 धावांची खेळी केली. कर्णधार सरफराज अहमदने नाबाद 41 धावा तडकावल्या. डेव्हिड विली व लियाम प्लंकेट यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

तीन अर्धशतके अन् एक शतक

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, पण इंग्लंडच्या फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला. या डावात तीन अर्धशतके व एक शतक साजरे करण्यात आले. जेसन रॉयने 87 धावांची आणि जॉनी बेअरस्टॉने 51 धावांची भागीदारी करताना पाकिस्तानच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 115 धावांची दमदार भागी केली. त्यानंतर जो रूटने 40, इयॉन मॉर्गनने नाबाद 71 आणि जोस बटलरने नाबाद 110 धावांची बहुमूल्य खेळी केली. बटलरने आपल्या खेळीत 9 सणसणीत षटकार व 6 नेत्रदीपक चौकार मारले. आता उभय संघांमध्ये येत्या मंगळवारी तिसरा वन डे सामना खेळवण्यात येणार आहे. उभय देशांमधील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.