ICC T20 World Cup 2024 – ‘या’ जोडीला सलामीला उतरवा; सौरव गांगुलीचा सल्ला

सध्या आयपीएल सामन्यांचे धूमशान सुरू आहे. आयपीएल सामने संपल्यानंतर आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेचा थरार 1 जूनपासून सुरू होणार आहे. अमेरिका आणि कॅनडा यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. तर टिम इंडियाचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध होणार आहे. टिम इंडियाचा दुसरा सामना पाकिस्तानसोबत होणार आहे. याची सर्व क्रिकेट रसिकांमध्ये उत्कंठा आहे. या विश्वचषक सामन्यासाठी टिम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी संघाला महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

टिम इंडियाच्या खेळाडूंनी कोणत्याही जडपण, दबावाशिवाय निर्भयपणे खेळणे गरजेचे आहे. टिम इंडियाच्या खेळाडूंनी देशाबाहेर आक्रमक खेळ करणे महत्त्वाचे आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या हे सर्व प्रतिभावान खेळाडू आहेत. त्यांची षटकार मारण्याची क्षमता जबरदस्त आहे. संघ निवडताना संतुलन राखणे महत्त्वाचे असल्याचे गांगुली यांनी सांगितले. या निवडलेल्या संघात संतुलन आणि समन्वय असणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी-20 विश्वचषकात सलामीला खेळायला हवे. विराटमध्ये 40 चेंडूत शतक झळकावण्याची क्षमता आहे. रोहितही आक्रमक फलंदाजी करतो. टी-20 मध्ये वय किंवा तरुण असणे गरजेचे नाही. या सामन्यांसाठी आक्रमक खेळ गरजेचा आहे. महेंद्रसिंग धोनी अजूनही खणखणीत षटकार मारतो आणि अजूनही संघासाठी मोठी धावसंख्या उभारण्याची क्षमता त्याच्याकडे आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी सलामीच्या जोडीचे नाव सांगत सौरव यांनी टिम इंडियाला मोलाचा सल्ला दिला आहे.