
सामना ऑनलाईन । मुंबई
दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील वसंत वाचनालय म्हणजे तमाम साहित्यप्रेमींचा आधारवड. वाचनालयाचे एकदा सभासद झालात की वाचनालयात या, कितीही वेळ पुस्तक चाळा घ्या, कोणतेही पुस्तक घ्या आणि कधीही परत द्या. ८० वर्षांचे वसंत सावरकर यांनी कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय एकहाती हा डोलारा उभा केला. येत्या १७ जुलै रोजी वसंत वाचनालयाला ६० वर्षे पूर्ण होत आहे. साहित्याचा वसंत असाच बहरत राहो, अशी अपेक्षा यानिमित्ताने साहित्यप्रेमी करीत आहेत.
कोणतेही सरकारी अनुदान न घेता, केवळ वाचकांच्या फीच्या आधारावर वसंत वाचनालयाचा कारभार चालतो. वाचनालयात आज १५ हजार पुस्तके असून सुमारे ८०० सभासद आहेत. बालवाचकांची संख्याही लक्षणीय आहे. साठ वर्षांपूर्वी सावरकर काका कोकणातून नोकरीच्या शोधात मुंबईत आले. खिशात फार पैसेही नव्हते. नातेवाईकांच्या घरी राहण्याची सोय झाल्यावर त्यांनी एका पुस्तकाच्या दुकानात नोकरी धरली. मात्र स्वत:चा व्यवसाय करण्याची जिद्द असल्यामुळे दादरच्या शिवाजी पार्कमध्ये आझाद हिंद रेस्टॉरंट म्हणजेच आताच्या चंद्रगुप्त हॉटेल बाहेर त्यांनी १७ जुलै १९५८ रोजी एका बाकावर वसंत वाचनालय सुरू केले. सुरुवातीला सावरकर काका सायकलवरून पुस्तके घेऊन वाचकांच्या घरांपर्यंत जात. या फिरत्या वाचनालयामुळे त्यांचे वाचक वाढले. त्या बळावर १९७४ मध्ये त्यांनी एका नव्या जागेत ब्राह्मण सहाय्यक संघासमोर रामदास भुवनमध्ये आपल्या वाचनालयाचे बस्तान बसवले.
खेळण्यांची लायब्ररी
२००५ साली मुलांनी खेळता खेळता पुस्तकांची गोडी लागली. या हेतूने सावरकर काकांनी अगदी एक वर्षाच्या बाळापासून ते १२ वर्षांच्या मुलांसाठी खेळण्यांची लायब्ररी सुरू केली. यामध्ये लहान मुलांच्या पुस्तकांचाही समावेश आहे. भातुकलीपासून ते बौद्धिक खेळांपर्यंत खेळणी येथे मिळतात.
गाईड वाचनालयाची अभिनव संकल्पना
वाचनालय सुरू करायच्या आधी सावरकर काका जुनी शैक्षणिक पुस्तकं अर्ध्या किमतीत विकण्याचा व्यवसाय ते करायचे. त्यानंतर त्यांनी थेट वाचनालय सुरू करण्याचा विचार केला. त्याकाळी एकेका विषयावर अनेक लेखकांची गाइड्स निघायची. जी घेणं, प्रत्येकाला परवडायचं नाही. त्यावेळी चक्क गाईड्सचे वाचनालय त्यांनी सुरू केले. त्यांची ही कल्पना लोकांना खूप आवडली.
इंग्रजीवर मराठी पुस्तक मोफत
आता मुले मराठी शाळेत शिकत नाहीत. सगळीकडे इंग्रजीचा प्रभाव दिसतो. त्यामुळे मराठी भाषा टिकणार कशी. हा प्रश्न सतावतो. त्यामुळे सावरकर काकांना इंग्रजी पुस्तके वाचनालयात ठेवावी लागली. मग लहान मुलांच्या इंग्रजी पुस्तकांसोबत त्यांना मराठी पुस्तक मोफत वाचायला देण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र या उपक्रमाला पालकांचा म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नसल्याची खंत सावरकर काकांनी व्यक्त केली.




























































