दहावी, बारावी परीक्षांच्या नियोजनासाठी सल्लागार समिती

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता एप्रिल-मेमध्ये होणाऱया दहावी आणि बारावी परीक्षांच्या नियोजनासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार समिती नेमण्यात आली असून या समितीची पहिली बैठक शुक्रवारी पुणे येथे पार पडली. या बैठकीत दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा या ऑफलाइनच घेतल्या जातील, असे मत तज्ञांनी मांडले.

राज्य शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक नुकतेच जाहीर केले. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असल्याने या परीक्षा कशा घ्यायच्या यासंदर्भात राज्यभरात विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने परीक्षेच्या संदर्भातील उपाय योजना सुचविण्यासाठी एक सल्लागार समिती नेमली असून त्या समितीची पहिली बैठक आज पुण्यामध्ये पार पडली. या बैठकीत राज्यभरातील शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांचा आढावा घेत दहावी आणि बारावीचे परीक्षा ही ऑफलाइन पद्धतीने घ्यावी यावर भर देण्यात आला. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर या सल्लागार समितीची पहिली बैठक पार पडली असल्याची माहिती दिली.

विद्यार्थी सुरक्षेवर भर

दहावी, बारावीच्या परीक्षा घेताना विविध प्रकारच्या उपाययोजना तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षा यावर कशा प्रकारे भर देता येईल यावर बैठकीत चर्चा झाल्याचे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी सांगितले.

अशी आहे समिती

दहावी-बारावीच्या परीक्षासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दहा जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. यात शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष वसंत काळपांडे, मंडळाचे माजी अध्यक्ष विनय दक्षिणदास यांच्यासह शिक्षण मंडळातील इतर अधिकारी, पुण्यातील ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक विजय जाधव, कात्रज येथील शाळेचे मुख्याध्यापक हरिश्चंद्र गायकवाड, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे प्राचार्य, विकास गरड, पुणे मंडळाचे सदस्य नितीन म्हेत्रे आदींचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या