लालपरी फुल्ल; खासगी प्रवासी वाहनाचे दर चौपट!

सण, उत्सव आता जवळ आले असताना, त्याची रिसेल सुरू झाली आहे. यामुळे एसटी महामंडळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आगाऊ बुकिंग सुरू झाले आहे. त्यामुळे खासगी प्रवासी गाड्यांची चंगळ सुरू झाली असून, नगरहून पुण्याला जाण्यासाठी सहाशे रुपये तिकीट मोजावे लागत आहे. असे असताना प्रशासन मात्र यावर काहीच ठोस निर्णय घ्यायला तयार नाही.

गणेशोत्सवासह येणाऱ्या सणांची तयारी सुरू झाली आहे. या सणांना गावाकडे जाण्यासाठी अनेकांची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे काही दिवसांपासून एसटीचे आगाऊ बुकिंग करण्यात येत आहे. अर्धे तिकीट असल्यामुळे महिलांची गर्दीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे. त्याप्रमाणात एसटी महामंडळाकडे बस उपलब्ध नाहीत. त्यामुळे खासगी वाहनधारकांचे फावले आहे. यावर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे नगरहून पुण्याला जाण्यासाठी खासगी वाहनांना सहाशे रुपये मोजण्याची वेळ आली आहे. रविवारपासून सर्रासपणे अशा पद्धतीने पैसे वसूल करून प्रवाशांची लूटमार करण्यात येत आहे. याकडे प्रशासन आणि पोलीसही दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.

स्टॅण्डभोवती खासगी वाहनांचा गराडा

अनेक खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा एसटी स्टँडभोवती गराडा पडल्याचे दिसून येते. त्यामुळे एसटी वाहतुकीला मोठ्या प्रमाणामध्ये अडचण निर्माण होत असते. एसटी स्टॅण्डमध्ये येऊन खासगी वाहनांचे चालक प्रवासी घेऊन जात असल्याचे दिसून येते. याकडे एसटी प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे या वाहनधारकांचे फावले असून, ते अवाच्या सवा पैसे वसूल करून प्रवाशांची लूट करत आहेत.