प्रवाशांच्या जिवाशी प्रशासनाचा खेळ, बदलापूर स्थानकात ‘एलफिन्स्टन’ होण्याचा धोका

सामना ऑनलाईन । बदलापूर

फलाट क्रमांक 1 व 2 वर पूर्ण शेड न टाकल्याने बदलापूरकर प्रवाशांना पावसाळ्यात पुलाचा आडोसा घ्यावा लागत आहे. या दाटीवाटीतच लोकल आल्यानंतर प्रवाशांची पळापळ सुरू होते. मध्य रेल्वेच्या या बेफिकीर कारभारामुळे चेंगराचेंगरी होण्याची भीती असून बदलापूर स्थानकात एलफिन्स्टनची पुनरावृत्ती होण्याचा धोका आहे.

एलफिन्स्टन पादचारी पुलावरून उतरताना झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक प्रवाशांचा हकनाक बळी गेला होता. या महाभयंकर दुर्घटनेने अवघा देश हादरून गेला. मात्र या घटनेनंतरही प्रशासनाला गांभीर्य नसल्याचे समोर आले आहे. बदलापूर स्थानकातील फलाट क्रमांक 1 व 2 वर पूर्ण शेड न टाकता छोटे पत्रे टाकले आहेत. त्यामुळे पावसापासून बचाव करण्यासाठी प्रवासी या पुलाचा आडोसा घेतात, पण धक्कादायक म्हणजे त्याचवेळी येणारी एखादी लोकल पकडण्यासाठी प्रवासी एकच धावपळ करतात. यामध्ये बऱ्याचदा चेंगराचेंगरी होते. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी रेल्वेच्या बेफिकीरपणामुळे एलफिन्स्टनसारखीच दुसरी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. या विरोधात शिवसेना नगरसेवक शैलेश वडनेरे यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. एखादी दुर्घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

शिवसेनेने उठवला आवाज
मध्य रेल्वेच्या या ढिसाळ कारभाराचा शिवसेनेने पर्दाफाश केला आहे. शिवसेनेचे नगरसेवक शैलेश वडनेरे यांनी शिवसैनिकांसह स्थानकात धडक देत अधिकाऱ्यांना फैलावर धरले. प्रवाशांच्या जिवाशी न खेळता फलाटांवर पूर्ण शेड टाकाव्यात, अन्यथा आंदोलन करू, असा इशाराच वडनेरे यांनी दिला आहे. शिवसेनेने उठवलेल्या आवाजाने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या